Leopard Snake Bite : नाशिकमध्ये (Nashik) पावसाळयात (Rainy) अनेक सर्पदंशाच्या (snakebite) घटना उघडकीस आल्या आहेत. त्यामुळे प्रशासन याबाबत नेहमी सतर्क राहून याबाबत जनजागृती करीत आहे. अशातच दिंडोरी (dindori) तालुक्यात बिबट्याचा (Leopard) सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. 


काही दिवसांपासून बिबट्याच्या अपघाती मृत्यूच्या अनेक घटना समोर आल्या असताना अशाप्रकारे सर्पदंशाची पहिलीच घटना समोर आल्याचे समजते आहे. नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील ननाशी वनपरिक्षेत्र असणाऱ्या कुहीआंबी शिवारात अडीच ते तीन वर्षाच्या बिबट्याचा सर्पदंशामुळे मृत्यू झाला आहे. नाशिक शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात बिबट्याची दहशत कायम असते. मात्र बिबट्याचा सर्पदंशाने झालेला मृत्यू सर्वाना चकित करत आहे. 


दिंडोरी तालुक्यातील ननाशी वन परिक्षेत्रात कुही आंबी शिवारात वास्तव्य करणाऱ्या एका शेतकऱ्याच्या शेतात मृत बिबट्या आढळून आला. याबतची माहिती ननाशी वनपरिक्षेत्राला कळविण्यात आली. घटनेची माहिती मिळाल्यांनतर सहाय्यक वन संरक्षक अनिल पवार, ननाशीच्या वनपरिक्षेत्र अधिकारी सविता पाटील आदींसह कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यावेळी अंदाजे अडीच ते तीन वर्षाचा नर बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. 


दरम्यान वन अधिकाऱ्यांनी घटनेची पाहणी केल्यानंतर तातडीने पंचनामा करण्यात आला. पंचनामा केल्यानंतर उमराळे येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर तनपुरे यांना घटनास्थळी बोलवण्यात आले. खाण्यातून विषबाधा झाली का? यासाठी तपासणी करण्यात आली. मात्र तसे काही तपासणीत आढळून आले नाही. अधिक तपासणी केल्या नंतर बिबट्याच्या मागच्या पायाला सर्पदंश झाल्याचे निदर्शनास आले. शव विच्छेदनातही 48 तासापूर्वी या बिबट्याला सर्पदंश झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर नानाशी वनपरिक्षेत्रातील रोपवाटकीत बिबट्यावर वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. 


जिल्ह्यात दोघा तरुणांना सर्पदंश 
पावसाळयात अनेक सर्पदंशाच्या घटना समोर येतात. दरम्यान नाशिकच्या चांदवड तालुक्यातील देखील तरुणांना सर्पदंश झाल्याचे समोर आले आहे. तालुक्यातील तळेगाव रोही येथील मच्छिंद्र मोतीराम पवार यांच्या उजव्या पायात सर्पदंश झाल्याने त्यांना तळेगाव रोहीतील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार करून त्यांना चांदवडच्या उपजिल्हा रुग्णालयात औषधोपचार करण्यात आले. दुसऱ्या घटनेत तालुक्यातीलच वडनेर भैरव येथील द्राक्ष बागेत शेतीचे काम करत असताना शेतमजुरीसाठी आलेल्या नामदेव सोमा जाधव यास सर्पदंश झाल्याने त्याच्यावर चांदवड जिल्हा रुग्णालयात औषधोपचार करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.