Nashik Ujjwal Nikam : अडीच वर्षांपूर्वी जळगावमधून खासदारकीची ऑफर आली होती, दोन तीन पक्षांनी विचारले होते. पण त्यादृष्टीने मी विचार केला नाही. राजकारणात पैसा लागतो. एवढा पैसा कुठून आणणार असा प्रश्न उपस्थित करत राजकारणात सध्या जी अस्थिरता आणि गढूळता आहे, ते बघून राजकारणात येण्याचा सध्या माझा विचार नाही, योग्य वाटत नाही, असे स्पष्टीकरण विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी दिले आहे.
नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानमध्ये अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाच्या वतीने चौथ्या लेखक प्रकाशक साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले. आज दुपारी विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांची प्रकट मुलाखत आयोजित साहित्य संमेलनात पार पडली. त्यानंतर उज्ज्वल निकम यांनी माध्यमांशी बोलताना राजकारणासंदर्भात आणि सत्ता संघर्षाबाबत भूमिका मांडली. यावेळी उज्ज्वल निकम यांचा मुलगा अनिकेत निकम हे देखील उपस्थित होते. यावेळी उज्ज्वल निकम यांना राजकारणात येणार का? असा प्रश्न विचारल्यावर त्यांनी दिलखुलासपणे उत्तर दिले होते.
यावेळी माध्यमांशी बोलताना उज्ज्वल निकम म्हणाले की, सत्तासंघर्षाबाबतही मी एवढं बोलतोय, हा घटनेने दिलेला अधिकार आहे. मात्र सद्यस्थितीत लोकांचा न्यायव्यवस्थेवरचा विश्वास उडत चालला आहे का? असा प्रश्नही उपस्थित होतो आहे. सामान्य माणसाला आजही न्यायव्यवस्था हा शेवटचा आशेचा किरण वाटतो आहे. दुसरीकडे प्रसारमाध्यम काय दाखवतात, यावर सामान्य माणूस जास्त विश्वास ठेवतो. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष पेटला आहे. या सत्तासंघर्षाबाबत निकाल कधी लागेल, हे सध्या सांगणं अवघड असलं तरी मात्र सर्वोच्च न्यायालयातील काही न्यायाधीश निवृत्त होणार असल्याने निकाल लवकर लागेल ही अपेक्षा आहे. शिवाय उच्च न्यायालयातून अनेक न्यायाधीशांची निवृत्ती होणार असून या निवृत्त न्यायाधीशानी राजकीय पदे स्वीकारू नये, असा सल्ला देखील यावेळी निकम यांनी दिला.
राजकारणात येणार का? अनिकेतचा वडिलांना प्रश्न...
दरम्यान या मुलाखतीत उज्ज्वल निकम यांचे चिरंजीव देखील उपस्थित होते. त्यांनी देखील यावेळी निकम यांना राजकारणात येणार का? असा प्रश्न विचारला. अडीच वर्षांपूर्वी मला जळगावमधून खासदारकीची ऑफर आली होती, दोन तीन पक्षांनी विचारले होते. पण त्यादृष्टीने विचार केला नाही, राजकारणात पैसा लागतो, एवढा पैसा कुठून आणणार? शिवाय राजकारणात सध्या जी अस्थिरता आणि गढूळता आहे, ते बघून राजकारणात येण्याचा सध्या माझा विचार नाही, योग्य वाटत नाही. चार-पाच वर्षानी जरी सरकारकडून पैसे येत असले तरी समाधानी असल्याचे वकील उज्ज्वल निकम म्हणाले.