Nashik News : गणपती बाप्पांचं (Ganpati Bappa) आगमन होणार म्हटलं की शहरांमध्ये अभूतपूर्व उत्साह आहे, मात्र दुसरीकडे नाशिककर शहरातील खड्ड्यांमुळे हैराण झालेले आहेत. याचाच विचार करून नाशिकच्या (Nashik) मिरची 98.3 च्या आर जे भूषण (RJ Bhushan) यांनी एक वेगळी संकल्पना राबवली आहे. या संकल्पनेत गणपती बाप्पाच्या आधी शहरात बाप्पाचे वाहन असलेला मूषक हा प्रातिनिधिक स्वरूपात शहराच्या रस्त्यांची पाहणी करत आहे. शिवाय आज मूषकमॅनने आयुक्तांची भेट घेत रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावण्याचे साकडे घातले आहे.
यंदाच्या पावसाळ्यात नाशिक शहरासह जिल्ह्यातील रस्त्याची अक्षरश चाळण झाली आहे. शहरातील रस्ते खड्ड्यात कि खड्ड्यात रस्ते अशी अवस्था झाली आहे. शिवाय मनपा प्रशासनकडून पावसाने उघडीप दिल्यापासून खड्डे बुजविण्यासाठी कामकाज सुरु आहे. मात्र तरी देखील खड्ड्यांचे साम्राज्य जैसे थे आहे. तर अशातच आता धुळीने देखील नाशिकरांना हैराण केले आहे. याच पार्श्वभूमीवर नाशिककरांशी वेळोवेळी हितगुज करणारा, नाशिकच्या समस्या मांडणाऱ्या रेडिओ मिरची भूषण मतकरी यांच्या संकल्पनेतील मूषकमॅन गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रस्त्यांच्या पाहणीसाठी आला आहे.
दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या आगमन करण्याआधी बाप्पानी आपले वाहन असणाऱ्या उंदीर मामांना पाठविले आहे. अशी संकल्पना रेडिओ मिरचीने राबविली आहे. गेल्या दोन दिवसांपासून हे मूषक मामा नाशिकच्या मुख्य रस्त्यावर जाऊन पाहणी करत आहेत. यामध्ये सिटी सेंटर मॉल, गंगापूर रोड, द्वारका, कॉलेज रोड आदी भागातील रस्त्यावरून फेरफटका मारत आहेत. पाहणी झाल्यांनतर त्यांनी आज थेट मनपा आयुक्त पुलकुंडावर यांची भेट घेत रस्त्यांवरील खड्ड्यांच्या दुरुस्तीबाबत साकडे घातले आहे.
दरम्यान दोन दिवसांच्या मूषकमॅनच्या पाहणी दौऱ्यात कुठले रस्ते चांगले आहेत आणि कुठल्या रस्त्यांवरती खड्डे आहेत हे शोधले आहे. यावेळी नाशिकच्या नागरिकांनी खड्ड्यांमुळे होणारा त्रास मूषकमॅनला बोलून दाखविला आहे. नाशिक महापालिकेच्या अधिकाऱ्यांना भेटून हे सगळे खड्डे लवकरात लवकर बुजवावे जेणेकरून गणपती बाप्पांना येताना त्रास होणार नाही आणि त्यांचे आगमन निर्विघ्नपणे होऊ शकेल अशी विनंती मूषक मॅनने आयुक्तांकडे केली आहे.
इथे साधा संपर्क
अवघ्या दोन दिवसा वरती गणेशोत्सव आलेला असताना नाशिक मधले बरेच खड्डे नाशिक महानगरपालिकेने अजूनही भरलेले नाहीत याचीच पाहणी करण्यासाठी गणपती बाप्पांचा मूषक मॅन प्रतिनिधिक स्वरूपामध्ये नाशकात आलेला असून तो विविध रस्त्यांवरती जाऊन खड्ड्यांची पाहणी करतो आहे. दरम्यान नाशिकरांना मूषक मॅनने आवाहन केले असून आपल्या भागाच्या खड्ड्यांची माहिती त्याला द्यावयाची असल्यास व्हाट्सअप क्रमांकावर आपल्या भागाचे किंवा रस्त्याचे नाव टाकून नागरिक आपल्या भागातील खड्ड्यांची माहिती मूषकमॅन ला देवू शकणार आहेत.
मूषकमॅनही पडला खड्ड्यात...
अवघ्या दोन दिवसा वरती गणेशोत्सव आलेला असताना नाशिक मधले बरेच खड्डे नाशिक महानगरपालिकेने अजूनही भरलेले नाहीत याचीच पाहणी करण्यासाठी गणपती बाप्पांचा मूषक मॅन प्रतिनिधिक स्वरूपामध्ये नाशकात आलेला असून तो विविध रस्त्यांवरती जाऊन खड्ड्यांची पाहणी करतो आहे. याच दरम्यान बॉईज टाऊन ते सिबल हॉटेल या रस्त्याची पाहणी करताना मूषक मॅनच खड्ड्यात पडला. आणि त्याच्या हातालाही दुखापत झाल्याचे समजते आहे. या सगळ्याचा विचार करून नाशिक महानगरपालिकेने लवकरात लवकर खड्डे मुक्त नाशिक करावे अशीच सगळ्या नाशिककरांची अपेक्षा आहे.