Nashik News : नाशिककरांसाठी आनंदाची बातमी असून अखेर नाशिकच्या विमानसेवेला बूस्ट मिळाला आहे. इंडिगो कंपनीकडून पुन्हा एकदा नाशिकच्या प्रवाशांसाठी सेवा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला असून 1 जूनपासून नव्याने विमानसेवेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहेत. त्यानुसार नाशिकमधून असंख्य शहरांना जोडले जाणार आहे.


नाशिक (Nashik) शहराची विमानसेवा (Air Service) गेल्या काही वर्षात डबघाईला आल्याचे चित्र आहे. अनेक सेवा बंद पडत असल्याने, अनेक एअरव्हेज कंपन्या नाशिकमधून काढता पाय घेत असल्याने प्रवाशी संख्येत देखील घट झाली आहे. मात्र सद्यस्थितीत पुन्हा एकदा इंडिगोने (Indigo) जूनपासूनचे वेळापत्रक जाहीर केल्याने नाशिककरांना दिलासा मिळाला आहे. इंडिगोने जाहीर केलेल्या नव्या वेळापत्रकात देशभरातील महत्त्वाच्या शहरांना समाविष्ट करण्यात आले आहे. त्यात कोलकाता, तिरुअनंतपुरम, वाराणसी, तिरुपती, बेंगलुरु, अमृतसर या धार्मिक शहरांचादेखील समावेश करण्यात आला आहे. एकूण 32 शहरांमध्ये विमानसेवा दिली जाणार आहे. 


ओझर येथील नाशिक विमानतळावरुन (Ojhar Airport) सध्या स्पाईसजेट कंपनीची नाशिक-नवी दिल्ली आणि नाशिक-हैदराबाद या शहरांसाठी सेवा सुरू आहे. तर, 15 मार्चपासून इंडिगो कंपनीची सेवा सुरू झाली आहे. इंडिगोच्यावतीने गोवा, अहमदाबाद, नागपूर आणि हैदराबाद या शहरांसाठी सेवा दिली जात आहे. येत्या 1 जूनपासून इंडिगोने विमानसेवेचा विस्तार केला असून नव्याने जाहीर केलेल्या शेड्यूलमध्ये अहमदाबाद, नॉर्थ गोवा, इंदूर, हैदराबाद, नागपूर, अमृतसर, बंगळूर, भोपाळ, भुवनेश्वर, चंडीगड, चेन्नई, कोइमतूर, डेहराडून, दिल्ली, जयपूर, कोची, कोलकता, कोझिकोड, लखनौ, मेंगलुरु, रायपूर, राजमुंद्री, रांची, तिरुअनंतपुरम, तिरुपती, उदयपूर, वाराणसी, विशाखापट्टणम, विजयवाडा या शहरांचा समावेश केला आहे.


नाशिकच्या धार्मिक पर्यटनाला यानिमित्ताने चालना मिळून विकासाची गती वाढणार आहे. प्रथमच 32 शहरांना एकाच वेळी सेवा पुरविली जाणार असल्याने विकासाचा वेग वाढेल. महत्त्वाच्या शहरांना जोडणारी विमानसेवा हवी ही मागणी अनेक वर्षांपासून होती ती पूर्ण होत आहे. आता प्रतिसाद देण्याची जबाबदारी नाशिककरांची असल्याचे एका प्रवाशाने सांगितले. 


32 शहरांना जोडणार 


गेल्या तीन वर्षांपासून इंडिगो कंपनीची नाशिकला प्रतिक्षा होती. अखेर इंडिगो कंपनीने नाशकात एण्ट्री केली आहे. इंडिगो कंपनीकडून नाशिकहून गोवा, अहमदाबाद, नागपूर आणि हैदराबाद या शहरांसाठी सेवा दिली जात आहे. इंडिगो कंपनीची सेवा अतिशय व्यावसायिक पातळीवर यशस्वी समजली जाते. त्यांचे आगमन नाशकात झाल्याने आगामी काळात नाशिक विमानसेवेला मोठा वेग येणार असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. एकाच वेळी दररोज 32 शहरांना जोडणारी विमानसेवा प्रथमच सुरु होत आहे. विशेष करून आयटी तसेच नाशिकच्या धार्मिक पर्यटनाला या निमित्ताने चालना मिळणार आहे. मुंबई, ठाणे व नवी मुंबईच्या प्रवाशांना देखील या निमित्ताने पर्याय निर्माण झाला आहे.