Trimbakeshwer News : त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer) येथील अहिल्या धरणावरील बांधकामाचा वाद चिघळत चालला असून दोन दिवसांपूर्वी स्थानिक साधू महंतांनी बांधकामावर आक्षेप घेत आंदोलन केले. त्याचबरोबर साधू महंतांनी बांधकाम साहित्याची तोडफोड केल्याने त्र्यंबकेश्वर पोलिसांत (Trimbakeshwer Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्र्यंबकेश्वर मंदिराचे माजी विश्वस्त ललिता शिंदेवर विडिओ व्हायरल केल्याप्रकरणी ठपका ठेवण्यात आला आहे.


गेल्या काही दिवसांपासून नाशिक (Nashik) त्र्यंबकेश्वर येथील अहिल्या धरणाच्या वरच्या बाजूस पुलाचे बांधकाम सुरू आहे. यावरून ब्रम्हगीरी कृती समितीसह पर्यावरण प्रेमींनी याबाबत आवाज उठविला होता. त्यानंतर हे काम बंद पाडण्यात आले होते. मात्र नंतर पुन्हा हे काम सुरु करण्यात आले. यावरून स्थानिक साधू महंतांनी एकत्र येत बांधकाम स्थळी आंदोलन करत बांधकाम साहित्याची तोडफोड केली. यासंदर्भातील व्हिडीओ व्हायरल झाला. यावरून स्थानिक नारपरिषद प्रशासनाने त्र्यंबक पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर माजी ललिता शिंदे (Lalita Shinde) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  


अहिल्या धरणाच्या वरच्या बाजूस असलेल्या नाल्यावर उभारण्यात येत असलेल्या पुलाच्या कामकाजाची साधूंकडून तोडफोड केल्यानंतर समाज माध्यमात व्हिडिओ व्हायरल झाला. या प्रकरणी शिंदे यांच्यावर साधूंना प्रोत्साहन देण्याचा आक्षेप घेत पालिका प्रशासनाने त्रंबक पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. ललिता शिंदे चिथावणी देण्यासाठी व्हिडिओ समाज माध्यमात व्हायरल केल्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. अहिल्या धरणाच्या मागच्या बाजूस काही महिन्यांपासून एका नाल्यावर पुलाचे बांधकाम सुरू आहे. मंगळवारी दुपारी या पुलाच्या कामावर साधूंनी एकत्र येत तेथील सेंटरिंगच्या साहित्याची मोडतोड केल्याचा आरोप करण्यात आला आहे. 


दरम्यान व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नगरपालिका प्रशासनाने दखल घेतली. साधूंच्या भावना समजून घेण्यासाठी नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकीत ब्रह्मगिरीला क्षती पोहोचवण्याचे काम सुरू असून गोदावरीचे स्रोत कमी होत आहेत. म्हणून आम्ही बांधकामाला विरोध करत होतो, अशी यावेळी साधुमंतांनी कबुली दिली. दरम्यान नगरपालिका अभियंता यांनी कामाच्या परवानगी तसेच त्यासाठी उपलब्ध असलेला शासनाचा निधी याबाबत माहिती उपस्थित साधूना दिली. तसेच मागच्या काही महिन्यांपूर्वी महंत गोपालदास यांनी पुलाच्या कामाला हरकत घेतली होती. त्यावेळेस सहाय्यक जिल्हाधिकारी यांनी जागेला भेट दिली होती. पुलाच्या खाली असलेले काम दूर अंतरावर घेण्याचे ठरवले होते. मात्र तरीही साधूंनी तेथे निदर्शनास आणून दिले. यावर महंत गोपालदास यांनी नियमाप्रमाणे काम होत असेल तर आमचे काही म्हणणे नसल्याचे मत त्यांनी बैठकीत साधू महंतांच्या वतीने मांडले. 


लोकवस्ती नसताना रस्त्याची लगीनघाई... 
तर दुसरीकडे ब्रह्मगिरी विकास कामे केलेल्या उत्खनाची घटना ताजी असतानाच ब्रह्मगिरीच्या दुसऱ्या बाजूने रस्ता उभारण्याची घाई त्र्यंबकेश्वर नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना झाल्याची आरोप पर्यावरण प्रेमींनी केला आहे. नया उदासीन आखाडा ते कालिका मंदिर इथपर्यंत या रस्त्याचे काम सुरू असून कोणतीही लोकवस्ती नसताना हा रस्ता बांधणीचा अट्टाहास कशासाठी असा प्रश्न उपस्थित होत आहे. या संदर्भात देखील माजी विश्वस्त शिंदे यांनी तक्रार केल्यानंतर  मुख्याधिकाऱ्यांनी ग्रामदेवता कालिका माता मंदिराकडे जाण्यासाठी रस्ता उपलब्ध असल्याचे तसेच एक मोठा ओहोळ असल्याने नागरिकांना येण्यासाठी अडचणी येत होत्या. यासाठी हा रस्ता तसेच पुलाचे बांधकाम करण्यात येत असल्याचा निर्वाळा दिला होता.