Nashik Crime : नाशिकसह (Nashik) जिल्ह्यात लाचखोरीने अक्षरशः उच्छाद मांडला असून नाशिकसह जिल्ह्यात दर आठवड्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई होत असताना लाचखोरी (Bribe) थांबण्याऐवजी दिवसेंदिवस वाढत आहे. लाचलुचपत विभागाचे अधिकारी, कर्मचारी कसोशीने लाचखोरीला आळा बसावा यासाठी प्रयत्न करत आहेत. परंतु लाचखोरी थांबायचं नाव घेत नाही. 


नाशिक इगतपुरी (Igatpuri) तालुक्यातील बलायदुरी येथील ग्रामसेविकेसह महिला सरपंच एसीबीच्या जाळ्यात सापडली असून ग्रामपंचायत शिपायाकडून 50 हजारांची लाच घेताना या दोघींसह एकास अटक करण्यात आली आहे. इगतपुरी तालुक्यातील बलायदुरी येथील ग्रामपंचायतीच्या निवृत शिपायाचा रहिवास भत्ता मंजूर करण्यासाठी 50 हजारांची लाच घेणाऱ्या सरपंचासह ग्रामसेविकेला व एका नागरिकाला रंगेहाथ पकडण्यात आले. आशा देवराम गोडसे या ग्रामसेविकेसह हिरामण पांडुरंग दुभाषे या सरपंचाला व मल्हारी पंढरीनाथ गटकळ या नागरिकाला लाच स्वीकारताना ताब्यात घेण्यात आले. 


तक्रारदार हे बलायदुरी ग्रामपंचायतीचे शिपाई असून, जून 2020 मध्ये निवृत्त झाले. ग्रामपंचायतीकडून त्यांना 1 लाख 64 हजार 682 रुपये भत्त्याच्या बिलाची रक्कम मिळणे बाकी होते. या रकमेचा धनादेश बनवून देण्यासाठी गोडसे व दुभाषे यांनी लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार केली. त्यानुसार एसीबीच्या पथकाने सापळा रचून लाच स्वीकारणाऱ्या तिघांना पकडले. एसीबीचे पोलिस निरीक्षक संदीप घुगे, हवालदार एकनाथ बाविस्कर, राजेंद्र जाधव संतोष गांगुर्डे व अंमलदार शरद हैंबाडे, नितीन नेटारे यांच्या पथकाने ही कारवाई केल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिली आहे.


नाशिकसह जिल्ह्यातील मागील काही लाचखोरीच्या घटनांचा आढावा घेतला असता नाशिक जिल्ह्यात दहापेक्षा अधिक लाचखोरीच्या घटना समोर आल्या आहेत. त्यांनतर आता थेट राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांसह दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा लाचखोरीचे जाळे शिपायापासून ते अधिकाऱ्यांपर्यंत पसरल्याचे अधोरेखित झाले आहे.


लाच मागितल्यास इथे संपर्क साधा... 


दरम्यान या सापळ्यामध्ये एसीबीचे पोलिस निरीक्षक संदीप साळुंखे, पोलिस नाईक प्रभाकर गवळी, पोलिस नाईक शरद हेंबाडे, चालक संतोष गांगुर्डे यांचा समावेश होता. पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. एसीबीच्यावतीने आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/ कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ टोल फ्री क्रमांक 1064 वर संपर्क साधावा.