Nashik Rain : नाशिकमध्ये (Nashik) यावर्षी मार्चमध्ये झालेला अवकाळी पाऊस गेल्या आठ वर्षांतील सर्वाधिक पाऊस असल्याचं हवामान विभागाच्या वेधशाळेने सांगितलं आहे. त्याचबरोबर राज्यात देखील सर्वाधिक पाऊस हा नाशिक जिल्ह्यात झाल्याची नोंदही करण्यात आली आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. 


यंदा अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) राज्यात चांगलीच हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान  (Crop Damage) झाले. नाशिक जिल्ह्यातही (Nashik District) मार्च महिन्यात दोन टप्प्यात अवकाळी पावसाने हजेरी लावून दाणादाण उडवली. पहिला 4 ते 8 मार्च आणि दुसरा 15 ते 19 मार्च दरम्यान पाऊस पडला. त्यानंतर नाशिक जिल्ह्यात यंदा मार्च वगळता एकही अवकाळी पाऊस झाला नाही. नाशिक (Nashik City) येथील भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (आयएमडी) वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी मार्च महिन्यात जिल्ह्यात 38.6 मिमी पाऊस झाला आहे. वेधशाळेतील नोंदी केवळ नाशिक शहरापुरत्या मर्यादित आहेत. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या कालावधीत ग्रामीण भागात सरासरी 36.6 मिमी पावसाची नोंद झाली आहे. 


दरम्यान हवामान विभागाच्या (IMD) अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यांच्या 2000 नंतरच्या रेकॉर्डनुसार सर्वाधिक पाऊस 2015 मध्ये (50.6 मिमी) झाला. वर्ष 2009 आणि 2014 मध्ये 16.3 मिमी पाऊस पडला. इतर महिन्यांत पाऊस 12.3 मिमीपेक्षा कमी किंवा शून्य होता, मात्र यंदा अवकाळी पावसाने संपूर्ण जिल्ह्याला झोडपून काढले. अवकाळी पावसाने बागायती आणि पिकांचे नुकसान केले तरीही दुसऱ्या स्पेलमध्ये नोंदवलेले नुकसान मोठे होते. अवकाळी पावसाच्या पहिल्या टप्प्यात नाशिक जिल्ह्यात 1 हजार 746 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. एकूण 323 गावांतील एकूण 3 हजार 946 शेतकरीबाधित झाले असून ज्या शेतकऱ्यांच्या पिकाचे 33 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त नुकसान झाले आहे. 


दरम्यान अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले. अशा शेतकऱ्यांसाठी प्रशासनाने राज्य सरकारकडे 2.6 कोटी रुपयांची मदत मागितली आहे. निफाड या तालुक्याचा सर्वाधिक फटका बसला, जिथे 1 हजार 355 हेक्टर शेतातील पिकांचे नुकसान झाले. अवकाळी पावसाच्या दुसऱ्या टप्प्यात 7 हजार 424 हेक्टर जमिनीवरील पिकांचे - बागायती आणि बारमाही पिकांचे नुकसान झाले आहे. या अवकाळी पावसामुळे एकूण 560 गावे बाधित झाली असून 18 हजार 990 शेतकरी बाधित झाले आहेत.


राज्यातील सर्वाधिक पाऊस नाशिकमध्ये 


यंदाच्या वर्षात शेतकऱ्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागला. शेतीमालाला भाव मिळत नसताना दुसरीकडे अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. नाशिक (Nashik City) शहरासह जिल्ह्यात अवकाळी पावसाने सलग आठ दिवस हजेरी लावत शेतकऱ्यांना दुहेरी संकटात पाडले. म्हणजेच मागील आठवड्यपर्यंत वातावरणात गारवा जाणवत होता. मात्र आठवडाभर सुरु असलेल्या अवकाळी पावसामुळे आणि वातावरण बदलामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले. अवकाळी पाऊस (Unseasonal rain) आणि गारपिटीमुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले. राज्यात सर्वाधिक अवकाळी पाऊस नाशिक जिल्ह्यात झाला असून सुमारे 38.6 मिमी इतका पाऊस पडल्याची नोंद हवामान खात्याने केली आहे.