Nashik Rain : राज्यातील काही भागात पावसाचा जोर वाढला असून नाशिक (Nashik) जिल्ह्यातील इगतपुरीतही (Igatpuri) संततधार सुरू आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांची चाळण झाली आहे. मंगळवारी तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यात तळोशी चौफुलीवरील रस्ता एका ठिकाणी रस्ता वाहून गेला. त्यामुळे तेथे भला मोठा खड्डा पडला असून पूर्ण वाहतूकच बंद झाली आहे. 


नाशिक शहरासह जिल्ह्यातील काही भागात पावसाची रिमझिम सुरु आहे. मात्र इगतपुरी तालुक्यात पावसाचा जोर चांगला आहे. मात्र या पावसात तळोशी चौफुलीवरील समृद्धी महामार्गाजवळचा मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचा २ महिन्यापूर्वीचा बनविलेला रस्ता पावसाळ्यात सुरवातीलाच वाहून गेल्याने परिसरातील नागरिकांची मोठी पंचाईत झाली. दरम्यान दोनच दिवसांपूर्वी इगतपुरी शहराला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटल्याने ठेकेदाराच्या निकृष्ट कामाचे दर्शन झाले होते. त्यानंतर आता पुन्हा सदर रस्ता वाहून गेल्याने रस्ता ठेकेदाराचे पितळ उघडे पडले आहे. 


इगतपुरी तालुक्यातील तळोशी चौफुलीवरील समृद्धी महामार्गाजवळचा रस्ता वाहून गेल्याने नागरिक जीव धोक्यात घालून या मार्गावरून प्रवास करीत आहेत. शिवाय या रस्त्यावरून पाणी वाहून जाण्यास मार्ग नसल्याने सदर रस्ता वाहून गेल्याचे नागरिकांनी सांगितले. यात जवळच्या शेतातील रोपे वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान येथून वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग नसल्याने अनेकदा वाहनधारक या रस्त्याचा अवलंब करतात. मात्र रात्री-अपरात्री वाहून गेलेल्या रस्त्याचा अंदाज न आल्यास मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संबंधित विभागाने वेळीच रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी अपेक्षा वाहनधारकांनी व्यक्त केली आहे. 


तसेच या मार्गावर इगतपुरी, घोटी, तळोशी आदी गावांतील ग्रामस्थ रोज दैनंदिन अथवा शेतीचा कामांसाठी ये-जा करीत असतात. काही वाहनधारक तळोशीवरून सिन्नर महामार्गावरील अवजड वाहनांची वाहतूक लक्षात घेत शिर्डी या ठिकाणी जातात. त्यामुळे रोजच या रस्त्यावरून चारचाकी वाहनांची ये-जा सुरू असते. शनिवारी रात्री झालेल्या पावसामुळे या मार्गावरील रस्त्याच्या मधला भाग वाहूनच गेल्याने परिसरातील नागरिक व वाहनधारकांची मोठी पंचाईत झाली आहे. त्यांना आता इप्सितस्थळी पोचण्यासाठी फेरा मारावा लागणार आहे.