Nashik Rain : नाशिक (Nashik) शहर परिसरासह जिल्ह्यातील काही भागात अधून मधून संततधार (Rain) सुरूच आहे. तर आज पहाटेपासून जोरदार पावसाला सुरवात झाली आहे. गेल्या तीन दिवसांपासून नाशिक शहर आणि जिल्ह्यात ऊन ढगाळ वातावरण पाऊस अशी स्थिती पाहायला मिळाली. तर आज पहाटेपासून जोरदार सरी कोसळत आहेत.


गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहर व गंगापूर (Gangapur Dam) पाणलोट क्षेत्र असलेल्या त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer) परिसरात पावसाची संततधार सुरूच आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नदी नाल्याना काही प्रमाणात पूर आला आहे. तर नाशिक शहरात ढगाळ हवामानासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होत आहे. तर आज सकाळपासून धरणांच्या पाणलोट क्षेत्रात आणि घाटांच्या परिसरात पावसाचा जोर अधिक आहे. नाशिकमध्ये गणेश विसर्जनानंतर पावसाचा जोर वाढला आहे. मात्र दिवसभरात कधी उन तर कधी पाऊस असे वातावरण पाहायला मिळतहोते. मात्र काल सायंकाळपासून कमी-अधिक प्रमाणात पावसाची हजेरी कायम आहे. कधी रिमझिम, कधी हलक्या सरी, तर कधी अचानक पडणाऱ्या जोरदार सरींमुळे शहरात वातावरणात गारवा आहे. 


दरम्यान गणेशोत्सवात पावसाने नाशिककरांची दाणादाण उडवली होती. यावेळी नागरिकांना गणेशोत्सवात फारसा आनंद घेता आला नाही. त्यानंतर गणेश विसर्जनाच्या दिवशी मात्र पावसाने उघडिप दिल्याने नाशिककरांनी आभार मानले होते. त्यानंतर पुन्हा एकदा पावसाने दमदार आगमन केले असून आज पहाटेपासूनच संततधार सुरु आहे. सध्या होणार पाऊस जोरदार नसला तरी संततधार असल्याने नोकरवर्ग, चाकरमाने, नागरिक यांची कसरत पाहणारा आहे. तर दुसरीकडे मनपा प्रशासनाने मोठया मुश्किलीने बुजवलेले खड्डे पुन्हा एकदा डोके वर काढून बसले आहेत. ज्या ठिकाणी रस्त्याची कामे सुरू आहेत, ते रस्ते चिखलमय झालेले आहेत. शहरातील रस्ते पाणी साचल्याने खूपच खराब झाले आहेत. 


त्र्यंबकेश्वर परिसरात जोरदार
दरम्यान गंगापूर पाणलोट क्षेत्रातील त्र्यंबकेश्वर, गिरणारे परिसरात पावसाची रिपरिप सुरू आहे. नागरिकांसह कामावर जाणाऱ्यांना रेनकोट परिधान करूनच बाहेर पडावे लागत आहे. नाशिक शहरात मात्र अधूनमधून पावसाच्या सारी कोसळत आहेत. तर आज पहाटेपासून मात्र पावसाचा जोर वाढला आहे. काल दिवसभरात पावसाची रिपरिप सुरू होती आणि अधूनमधून काही जोरदार सरी कोसळल्या. तर सकाळपासूनच जैसे थे परिस्थिती आहे. नाशिक शहरात पाऊस सुरूच असून जिल्ह्यातील इगतपुरी व त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer) पट्ट्यात पावसाची सत्ताधार सुरूच आहे. 


गंगापूर धरणातून विसर्ग 
दरम्यान जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात  सुरू असलेल्या पावसाने धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे.  पावसाचा जोर टिकून असल्याने आज सकाळी 10 वाजता 2000 Cuses करण्यात येणार आहे, तर अकरा वाजेपासून 5000 क्युसेकने गंगापूर धरणातून विसर्ग गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येईल. पावसाचा जोर सतत राहिल्यास टप्याटप्याने विसर्ग वाढण्यात येईल.