Nashik Rain : नाशिक (Nashik) शहरासह परिसरात अनंत चतुर्दशीच्या (Anant Chaturdashi) पूर्वसंध्येला पावसाने तुफान बॅटिंग (Heavy Rain) केली असून नाशिककरांसह गणेशोत्सवात (Ganeshotsav) देखावे पाहण्यासाठी आलेल्या भाविकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. त्यामुळे पावसाने भाविकांच्या उत्साहावर पाणी फेरले आहे. 


गेल्या आठ दिवसांपासून सुरु असेलल्या गणेशोत्सवाला प्रत्यक्ष देखावे बघण्यासाठी गुरुवारी अखेरचा दिवस असल्याने भाविकांनी आज दुपारपासूनच गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. मात्र सायंकाळी पावणे सहा वाजेच्या सुमारास नाशिकच्या सीबीएस, गंगापूर रोड, मुंबई नाका, पंचवटी आदी महत्वाच्या परिसरात पावसाने मुसळधार हजेरी लावली. काल झालेल्या पावसानंतर भाविकांना आज दिलासा मिळणार असल्याची शक्यता होती, मात्र तसे न घडत नेमका देखावे पाहण्यासाठी गेल्यानंतर जोरदार पाऊस सुरु झाला. 


दरम्यान हवामान खात्याने नाशिकला आज गुरुवारपासूनच पावसाचा इशारा दिला होता. तत्पूर्वी बुधवारी देखील पावसाने हजारी लावल्याचे पाहायला मिळाले. तर आज देखील सायंकाळी ढगांच्या गडगडाटासह वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. तर गणरायाचे आगमन झाले तेव्हा पावसाने हजेरी लावली होती. तर आता लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी पावसाने हजेरी लावल्याचे चित्र आहे. शहरात सगळीकडे लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी जय्यत तयारी सुरु आहे. दरम्यान हवामान खात्याकडून नाशिकला गुरुवारपासून शनिवारपर्यंत यलो अलर्ट देण्यात आला आहे. 


नाशिकला यलो अलर्ट 
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे पुन्हा एकदा राज्यात बहुतांश भागात पावसाने हजेरी लावली आहे. तर याच पार्श्वभूमीवर नाशिकला यलो अलर्ट देण्यात आला होता. त्यानुसार आजही शहरात पावसाने हजेरी लावण्यात आली असून शनिवारपर्यंत यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर आज सकाळपासुन शहरात उकाडा जाणवत होता. त्यांनतर सायंकाळच्या सुमारास शहराच्या मध्यवर्ती भागासह पंचवटी, नाशिकरोड, उपनगर, वडाळागाव, इंदिरानगर, द्वारका, जुने नाशिक आदी परिसरात जोरदार सरींचा वर्षाव झाला. 


गणेश मंडळासह भाविकांची धावपळ 
एकीकडे उद्या अनंत चतुर्दशी असल्याने आज नाशिक शहरातील देखावे पाहण्यासाठी भाविक उत्सुक होते. मात्र सायंकाळी आलेल्या पावसांनंतर गणेश मंडळासह भाविकांची चांगलीच पळापळ झाली. संध्याकाळी सार्वजनिक मंडळाच्या देखावे खुले करण्याचे काम सुरु होते. मात्र आज सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास जोरदार पावसाला सुरवात झाली. त्यानंतर पुढील एक तास हा पाऊस कोसळत होता. यावेळी तासभर झालेल्या पावसामुळे मंडळाच्या कार्यकर्त्यानी देखावे, गणेशमूर्ती, झाकण्यासाठी पान कापडाचा आधार शोधला. पावसाच्या जोरदार हजेरीमुळे मंडळांनी देखावे उशिरा खुले करण्यात येणार आहेत.