Nashik News : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवारांच्या (Dr. Bharati Pawar) दिंडोरी मतदारसंघातच (Dindori Assembly) आरोग्य सुविधांचा अभाव असल्याचे समोर आले आहे. तालुक्यातील वनारवाडी (Vanrwadi) येथील एका 65 वर्षीय महिलेचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वेळेवर उपचार न मिळाल्याने या महिलेला जीव गमवावा लागल्याची घटना घडली आहे. या प्रकरणामुळे पुन्हा एकदा आरोग्य व्यवस्थेचा भोंगळ कारभार समोर आला आहे.  


नाशिक जिल्ह्यातील (Nashik) आरोग्य व्यवस्था तुटपुंजी असल्याचे वारंवार अनेक घटनांवरुन निदर्शनास आले आहे. जिल्ह्यात आरोग्यमंत्री असताना देखील अनेकदा गर्भवती महिलांसह इतर नागरिकांना वेळेवर उपचार न मिळाल्याचे प्रकार घडले आहे. अशातच केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. भारती पवार यांच्या मतदारसंघातच आरोग्य सुविधांची वानवा असल्याचे चित्र समोर आले आहे. एका महिलेला सर्पदंश (snakebite) झाल्यानंतर तिला तातडीने ग्रामीण रुग्णालयात (Rural Hospital) दाखल करण्यात आले. मात्र सुविधा उपलब्ध नसल्याने त्यांनी सर्पदंशाची लस देत पुढील उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात पाठवले. मात्र इथे पोहोचण्यापूर्वीच या महिलेचा मृत्यू झाला. 


दिंडोरी (Dindori) तालुक्यातील वनारवाडी गावात राहणाऱ्या चंद्रभागाबाई नाईकवाडे या महिलेला शनिवारी (24 जून) पहाटेच्या सुमारास झोपेत सर्पदंश झाला होता हे बघताच कुटुंबियांनी त्यांना जवळीलच एका खाजगी रुग्णालयात आणि त्यानंतर दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तिथे त्यांना सर्पदंशाची लस देण्यात तर आली. मात्र ग्रामीण रुग्णालय असल्याने अतिदक्षता विभाग तसेच इतर साधनसामुग्री नसल्याने दिंडोरी रुग्णालय प्रशासनाने त्यांना तात्काळ नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यास सांगितले. जवळपास 28 किलोमीटर अंतर गाठत चंद्रभागाबाईंना घेऊन नातेवाईक नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात पोहोचले मात्र उपचार सुरु होण्यापूर्वीच त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. दिंडोरी ग्रामीण रुग्णालयातच त्यांना योग्य ते उपचार मिळाले असते तर आमचा रुग्ण वाचू शकला असता असा आरोप नातेवाईकांकडून करण्यात येतो आहे. दरम्यान या घटनेमुळे वनारवाडी परिसरावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.


जिल्हा रुग्णालयात रेफर करण्याचे प्रमाण अधिक 


दिंडोरी ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. समीर काळे म्हणाले की, महिलेला रात्री दोनच्या सुमारास सर्पदंश झाल्याचे निदर्शनास आले. पहाटेच्या सुमारास त्यांना दवाखान्यात आणल्यानंतर आवश्यक लस देण्यात आली. परंतु पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले होते. तर वनारवाडीचे सरपंच दत्तू भेरे म्हणाले की, दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात आरोग्य सुविधांचा अभाव तर आहेच. तिथून रुग्ण जिल्हा रुग्णालयात पाठवण्याचे प्रमाण जास्त आहे. सर्पदंश झालेल्या महिलेचा दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात उपचार करुनही मृत्यू कसा झाला, याची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. 


Nasik Dindori: दिंडोरी ग्रामीण रूग्णालयात योग्य उपचार न मिळाल्याने सर्पदंश झालेल्या महिलेचा मृत्यू