Nashik News : शिंदे फडणवीस (Shinde Fadnavis Governement) सरकारचा मंत्री मंडळ विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) तब्बल दीड महिन्यानंतर झाला. अखेर या मंत्री मंडळात उत्तर महाराष्ट्राचे (North Maharashtra) तब्बल पाच आमदारांना मंत्री मंडळात संधीही मिळाली. मात्र या सर्वात नाशिकचा पालकमंत्री (Nashik Gaurdian Minister) पदाच्या शर्यतीत अनेकजण सहभागी झाले आहेत. त्यामुळे नाशिक पालकमंत्री स्थानिक कि बाहेरचा मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित एकनाथ शिंदे गट आणि भाजप सरकारचा मंत्रिमंडळ तब्बल 40 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर झाला आहे. त्यामुळे वाऱ्यावर असलेल्या महाराष्ट्रातील जनतेला काहीसा दिलासा मिळाला आहे. दोन्ही गटाकडून प्रत्येकी 9 अशा 18 जणांना कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये उत्तर महाराष्ट्रातील नगरचे राधाकृष्ण विखे पाटील, जळगावचे गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, नाशिक मालेगावचे दादा भुसे तर नंदुरबारचे विजयकुमार गावित यांची वर्णी लागली आहे. मात्र गुलाबराव पाटील आणि विजयकुमार गावित यांच्याकडे त्यात्या जिल्ह्यांची पालकमंत्री पदाची धुरा देण्यात येईल अशी शकयता आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात शिंदे सरकार आल्यापासून नाशिकला पालकमंत्री नव्हता. त्यामुळे नाशिक जिल्हा अधांतरी असल्याचे वाटत होते. मात्र आता मंत्री मंडळ स्थापन झाले असून लवकरच नाशिकरांना पालकमंत्री मिळणार आहे. मात्र नाशिकचा पालकमंत्री कोण? असा यक्ष प्रश्न सध्या उपस्थित आहे. कारण नाशिकमधून तिसऱ्यांदा मंत्रिपदाची माळ दादा भुसे यांच्या गळ्यात पडली आहे. त्यामुळे ते देखील नाशिक पालकमंत्री पदी विराजमान होऊ शकतात. त्याचबरोबर भाजपचे संकटमोचक म्हणून ज्यांना ओळखले जाते असे गिरीश महाजन हे याआधी देखील नाशिक पालकमंत्री म्हणून काम पाहिले आहे. त्यामुळे महाजनांवर वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे. शिवाय नव्याने मंत्री म्हणून शपथ घेतलेले राधाकृष्ण विखे पाटील यांच्याबाबत देखील विचार होऊ शकतो, अशी सूत्रांची माहिती आहे.
स्वातंत्र्यदिनाचा ध्वज....
दरम्यान शिंदे फडणवीस सरकारचा मंत्री मंडळ विस्तार झाला असून आता सर्वांचे लक्ष कोणाला कोणते मंत्रिपद मिळते? यासोबतच कोणाकडे कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद दिले जाते, याकडे लागून राहिले आहे. अवघ्या पाच सहा दिवसांवर देशाचा ७५ वा स्वातंत्र्यदिन येऊन ठेपलेला आहे. नाशिक जिल्ह्यात अमृत महोत्सवी वर्षाचे ध्वजारोहण नवीन कोणत्या पालकमंत्र्यांच्या हस्ते होते हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे. त्यामुळे नाशिककरांना देखील नवे पालकमंत्री कोण येणार याबाबत उत्सुकता लागली आहे.
धक्कातंत्राचा वापर होईल का?
नुकतेच मंत्री पदाची शपथ घेतलेले अहमदनगरचे सहकार महर्षी राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर सहकार खात्याची जबाबदारी देण्यात येणार असल्याची माहिती आहे. तर गिरीश महाजन यांच्यावर जलसंपदा, दादा भुसेंकडे कृषी अशी संभाव्य खातेवाटप होण्याची शक्यता आहे. या सर्वात नाशिकचा पालकमंत्री पदाची धुरा विखे पाटलांकडे देऊन धक्कातंत्राचा वापर होण्याची शकयता आहे.