Nashik Political News : एकूणच मविआ सरकार (Mahavikas Aaghadi) कोसळलं असून उद्धव ठाकरे (Udhhav Thakaray) यांनी दिला आहे. त्यामुळे आता राज्यात लवकरच नवीन सरकार स्थापन होणार यात शंका नाही. मात्र आता लक्ष लागलंय ते नव्या मंत्री मंडळाकडे. त्यातही नाशिकचा पालकमंत्री घरचा होणार कि बाहेरचा असाही प्रश्न पुढे आला आहे. शिवाय संभाव्य मंत्री मंडळात आमदार देवयानी फरांदे (MLA Ddevyani Farande) यांचं नाव चर्चेत आल्याने नाशिक पालकमंत्री पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार? याबाबतची उत्सुकता वाढीस लागली आहे.  


शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोरी करत 'दुसरा' मार्ग अवलंबिला आहे. त्यामुळे आता राज्यात नवे भाजप शिंदेगट असे सरकार स्थापण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे नव्याने अस्तित्वात येणाऱ्या सरकारमध्ये नाशिकचा पालकमंत्री कोण ? यावर जिल्हाभर चर्चेला उधाण आले आहे. त्यातच फडणवीस आणि शिंदे गटाचे सरकार स्थापन झाल्यास नाशिक जिल्ह्यात सहा आमदार असून यामध्ये भाजपचे चार तर शिवसेनेचे मात्र शिंदे गटात सामील झालेले दोन आमदार आहेत. त्यामुळे नाशिकचा पालकमंत्री भाजपचाच राहणार शिवाय शहरातला राहणार का? याबाबत उत्सुकता शिगेला पोहचली आहे.


राज्यात पहिल्यांदा महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आले. मात्र महाविकास आघाडी सरकरचे दोन वर्ष कोरोना काळात गेले. त्यातच आता शिवसेनेचे मंत्री असलेले निष्ठावान एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत समर्थक आमदारांना बरोबर घेत शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली. एकनाथ शिंदे यांचे बंड सुरवातीला थंड होईल मात्र शिंदे यांचे बंड शिवसेनेवरच भारी पडले अन मविआ सरकार कोसळले. त्यामुळे आता राज्यात नवीन सरकार निर्माण होणार आहे. यामध्ये भाजपचा मुख्यमंत्री आणि शिवसेना बंडखोर उपमुख्यमंत्री असे सरकार अस्तित्वात येणार हे आता आता जवळपास निश्चित मानले जात आहे.


दरम्यान फडणवीस आणि शिंदे यांच्या नव्या सरकारच्या मंत्री मंडळाची संभाव्य यादीची चर्चा सुरू असताना दुसरीकडे नाशिकचा पालकमंत्री कोण होणार? की नाशिक जिल्ह्याला नवे मंत्रिपद मिळणार याचीच चर्चा सुरू झाली आहे. नाशिकचे पालकमंत्री पद राष्ट्रवादीचे छगन भुजबळ यांच्याकडे होते, त्या आधी भाजप सत्तेवर असताना गिरीश महाजन यांच्याकडे होते, तर त्यापूर्वी हे पद शिवसेनेकडेच राहिलेले आहे. त्यामुळे आता नाशिकचा होणारा पालकमंत्री हा शिवसेनेचा की भाजपाचा याबाबत चर्चांना उधाण आले आहे. 


सद्यपरिस्थिती पाहता जिल्ह्यात भाजपचे पाच तर शिवसेनेचे दोन आमदार आहेत. राज्याचा विचार करता सर्वाधिक आमदार हे भाजपाचे आहेत.  नाशिक शहरात देवयानी फरांदे, सीमा हिरे आणि राहुल ढिकले या तीन आमदारांसह चांदवड-देवळा मधून डॉ. राहूल आहेर तर बागलाणमधून दिलीप बोरसे असे पाच आमदार भाजपचे तर मालेगाव बाह्यमधून मंत्री राहिलेले दादा भुसे आणि नांदगावमधून सुहास कांदे हे शिवसेनेचे दोन आमदार आहेत. नाशिक जिल्ह्याला एक वेगळे महत्त्व असल्याने नाशिकचे पालकमंत्री पद हे ज्या पक्षाकडे सर्वाधिक आमदार आहे, त्याच पक्षाकडे जाते हा इतिहास आहे. त्यामुळे नाशिकचे पालकमंत्री पद हे भाजपच्या वाट्याला जाणार हे निश्चित आहे.


आमदार देवयानी फरांदे चर्चेत   
जिल्ह्याचा पालकमंत्री भाजपचाच हिणार हे निश्चित असून फरांदे की आहेर की ,शेजारच्या जिल्ह्यातून पालकमंत्री येणार अशी शक्यता आहे. असे जर झाले तर माजी पालकमंत्री गिरीश महाजन हेही पुन्हा नाशिकचे पालकमंत्री झाले तर नवल वाटायला नको. मात्र, एकूणच राजकीय परिस्थिती पाहता भाजपा आणि बंडखोर शिवसेना यांचे जर सरकार निर्माण झाले तर जळगाव जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे नुकतेच विधान परिषदेत निवडून आले असल्याने त्यांच्या गळ्यात विधानपरिषदेच्या विरोधीपक्षनेते पदाची माळ पडू शकते. त्यामुळे गिरीश महाजन यांना जळगावचे की नाशिकचे पालकमंत्री करणार याचीही चर्चा सुरू झाली आहे.