Nashik Flood : नाशिकचा पूर, म्हटलं कि अंगात धस्स होतं, मागील अनेक वर्षांपासून येथील पुरपरिस्थिती बिकट होत चालली आहे. नदीकाठावर असणाऱ्या सराफ बाजार, दहीपूल आदी परिसरात पुराचे पाणी घुसून व्यवसायिकांचे, नागरिकांचे अतोनात नुकसान होते. यानंतर नियोजन न केल्याने ऐनवेळी प्रशासनासह नाशिककरांची धावपळ होते. नेमक उंबरठ्यावर आलेला पाऊस कोणत्याही क्षणी धडकू शकतो. मात्र प्रशासनाकडून फक्त आदेश दिले असून अद्यापही साचणाऱ्या पाण्याचे निचरा करण्याचे नियोजन नसल्याने यंदाही सराफ बाजाराचे तुंबापुर होणार का? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जत आहे.
नाशिकची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी गोदामाई पावसाळ्यात रौद्र रूप धारण करते. त्यामुळे गोदावरीच्या काठावर अत्यंत दाटीवाटीने वसलेल्या मेन रोड, सराफ बाजार, दहीपूल, भद्रकाली हा परिसर आहे. या भागामध्ये अनेक अरुंद रस्ते असून, येथे दाटीवाटीने प्राचीन वाडे, इमारती, दुकाने वसल्यामुळे येथे पावसाळी गटार योजनेसाठी अत्यल्प जागा मिळालेली आहे. त्याठिकाणी बाजारपेठ असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये कचरा साचतो. हा कचरा बराच वेळा पावसाच्या पाण्याचा निचरा करणाऱ्या ड्रेनेजमध्ये अडकून पाणी तुंबते.
शिवाय हा सगळा रस्त्यावरील कचरा ड्रेनेजवरील ढाप्यामध्ये अडकतो. ज्यामुळे पाणी वाट मिळेल त्या पद्धतीने वाहते. त्याचप्रमाणे या भागात पूर्वीचा सरस्वती नाला वाहत असल्यामुळे त्या माध्यमांमधून देखील मोठ्या प्रमाणामध्ये पाणी जमा होते. या सर्वांचा परिणाम म्हणून दरवर्षी पावसाळ्यामध्ये सराफ बाजार, शुक्ल गल्ली, भद्रकाली, दहीपुल या परिसरामध्ये गुडघ्यापेक्षा अधिक पाणी साचून बाजारपेठेत मोठ्या प्रमाणामध्ये वित्तहानी होते. शिवाय येथील नागरिकांनी दरवर्षीं हा मनस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळे यंदा तरी पूरपरिस्थिती होणार नाही, अशी अपेक्षाही नागरिकांनी व्यक्त केली आहे.
2019 चा महापूर
दरम्यान 2019 मध्ये महापूर आल्यानंतर सराफ बाजार, भद्रकाली आदी परिसरातील जनजीवन विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळाले. यात सराफ बाजारातील अनेक दुकानांत पाणी घुसले होते. अनेक घरांत पाणी तसेच प्राचीन वाडे कोसळले होते. त्यानंतरही पूर परिस्थिती वाढतच असून नेहमीप्रमाणे स्थानिक नागरिकांना पाण्यात उतरून सगळा निचरा करावा लागतो. शिवाय दरवर्षीं येथील नागरिकांना या परिस्थितीला सामोरे जावे लागत असल्याने यंदाहि चिंता व्यक्त केली जात आहे.
लोकप्रतिनिधीच्या आश्वासनांचा महापूर
दरवर्षीं नाशिक महापालिका पावसाळापूर्व साफसफाईचे आदेश देत असते. यंदाही याबाबतचा आदेश दिला आहे. मात्र सद्यस्थितीत हि कामे संथगतीने सुरु असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. दरवर्षीं पुरामध्ये बाजारपेठेमधील नुकसानीची पाहणी करण्यासाठी प्रमुख लोकप्रतिनिधी येतात, सूचना व आश्वासने देतात व प्रत्यक्षात मात्र दरवर्षी परिस्थिती 'जैसे थे' असल्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. यंदाही स्थानिक अधिकाऱ्यांचे वारंवार लक्ष वेधल्यानंतरही पाहिजे त्या पद्धतीने सफाई होत नसल्यामुळे पाऊस तोंडावर आला असताना ड्रेनेजची साफ-सफाई, साचलेला कचरा याबाबतचे नियोजन कधी करणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.
फक्त कागदोपत्री काम
सराफ बाजार, शुक्ल गल्ली, दहीपूल या भागात दरवर्षी पावसाचे मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचून बाजारपेठेचे नुकसान होते. दरवर्षीं फक्त कागदोपत्री आदेश काढले जातात, मात्र प्रत्यक्षात स्थानिक पातळीवर येऊन कोणतेही काम करण्यात आलेले नाही. त्यामुळे दरवर्षी परिस्थिती जैसे थे आहे. प्रशासनाने फक्त जिओ टॅगिंग न करता प्रत्यक्ष काम करून इतका टन कचरा संकलित केल्याचे पुरावे द्यावेत? असा सवाल गोदावरी संवर्धन समितीचे देवांग जानी यांनी उपस्थित केला आहे.