Nashik News : 'मुलगा हा वंशाचा दिवा' अशी धरणा आजही लोकांमध्ये रुजवून असल्याचे ताज उदाहरण म्हणजे नाशिक (Nashik) मधील मुलींच्या जन्माचे (Girl Birth) प्रमाण दरवर्षी घटत असल्याचे चित्र आहे. नाशिक शहरात मागील तीन वर्षात मुलींच्या संख्येत दर हजार मुलांपेक्षा घसरण होत असल्याची बाब चिंतेचा विषय ठरत आहे. 2023 मध्ये दर हजारी मुलांना मागे 871 इतक्या मुलीच्या जन्माची नोंद झाली आहे. 


एकीकडे मुंबई (Mumbai), पुण्याच्या (Pune) वेगात विकासाकडे झेप घेणाऱ्या नाशिक (Nashik) शहरात मात्र मुलांच्या तुलनेत मुलींचा जन्मदर दरवर्षी घटत असल्याचे समोर आला आहे. त्याच दुसऱ्या बाजूला मुलींच्या जन्माचे स्वागतही मोठ्या जल्लोषात होत असल्याचे अनेक घटनांवरुन दिसून येत आहे. मात्र नाशिकसारख्या शहरात मुलींचा जन्मदर घसरत असल्याचे चित्र आहे. स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी सरकारने कठोर कायदे केले असले तरी प्रत्यक्षात सरकारी यंत्रणांकडून त्या कायद्यांची पुरेपूर अंमलबजावणी होत नसल्याचे यातून दिसत आहे. तसेच केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून मुलींसाठी 'बेटी बचाओ, बेटी पढाओ, अशी घोषणा देत माझी कन्या भाग्यश्री, सुकन्या समृद्धी' यासारख्या योजनां कार्यान्वित असताना जन्मदर घटण्यामागे कारण काय असा सवाल उपस्थित होत आहे. 


दरम्यान पाच ते सहा वर्षांपूर्वी नाशकात मोठ्या प्रमाणात गर्भलिंग तपासणी (Sex Determination Test) आणि स्त्रीभ्रूणहत्या करण्याचे प्रकार चर्चेत आले होते. नुकताच छत्रपती संभाजी नगर (Chatrapati Sabhajinagar) जिल्ह्यात एका कारद्वारे फिरते गर्भलिंग निदान केंद्र उघडकीस आले होते. नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात देखील असे प्रकार उघडकीस आल्यानंतर वैद्यकीय यंत्रणा हादरली होती. त्यानंतर सातपूर येथील एक डॉक्टरद्वारे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आदिवासी पाड्यात इनोव्हा कारद्वारे सोनोग्राफी यंत्र ठेवून चाचणी करत असल्याचे उघड झाले होते. त्यानंतर वैद्यकीय विभागाने सखोल तपास केल्यानंतर मुलीचा जन्मदर वाढल्याचे समोर आले. मात्र यंदा पुन्हा परिस्थिती जैसे थे झाली आहे. 


कोरोना काळात जन्मदर वाढला... 


दरम्यान नाशिक शहरात मागील वर्षांचा आढावा घेतला असताना दरम्यान 2017 मध्ये हजार मुलांना मागे मुलींच्या जन्माचे प्रमाण 907 इतके होते. 2018 मध्ये हजार मुलांना मुलींची संख्या 923 पर्यंत वाढली. मात्र 2019 नंतर घसरण सुरु झाली असून 2019 मध्ये दर हजारी मुलांना मागे 920 तर 2020 मध्ये 912 तर 2021 मध्ये 911 पर्यंत जन्मदर होता, मात्र 2022 मध्ये मुलींच्या जन्मदरात पुन्हा घट होऊन तो आकडा 880 वर आला होता. कोरोना काळ असताना 2021 मध्ये दर हजार मुलांना मागे 911 मुली तर 2022 मध्ये हा आकडा 880 पर्यंत खाली आला होता. मात्र एप्रिल 2023 मध्ये ही संख्या पुन्हा घटल्यामुळे आरोग्य प्रशासनाकडून चिंता व्यक्त केली जात आहे. 


चुकीचं आढळल्यास इथे साधा संपर्क


सद्यस्थितीत मुलींचा जन्मदर घसरल्याने गर्भलिंगनिदान चाचणी केली तर जात नाही ना असा संशय वैद्यकीय विभागाकडून केला जात आहे. त्यामुळे सोनोग्राफी सेंटर व इतरही कुठे गर्भनिदान किंवा स्त्रीभ्रूणहत्या होत असल्याचे लक्षात आले तर नागरिकांनी टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. अथवा amchi.mulgi. gov.in या संकेतस्थळावर माहिती द्यावी असे आवाहन नाशिक महानगरपालिकेचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर बाबासाहेब नागरगोजे यांनी यांनी केले आहे.