Nashik Crime : नाशिकच्या (Nashik) लासलगावमध्ये चोरटयांनी एटीएम (ATM Theft) मशीन चोरुन नेण्याचा प्रयत्न केला. मात्र वेळीच पोलिसांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर तातडीने संबंधित चोरट्यांचा पाठलाग केल्याने चोरट्यांनी घाबरुन मशीन रस्त्यातच फेकून दिलं. मशीनमधून जवळपास 15 लाख रुपयांची रक्कम मिळून आली आहे. वेळीच बँकेच्या कार्यालयातून पोलिसांना फोन गेल्याने आणि पोलीस तातडीने पोहोचल्याने ही चोरी अयशस्वी ठरली. 


लासलगाव विंचूर रोडवरील (Lasalgaon) ॲक्सिस बँकेचे नोटांनी (Axix Bank) भरलेले एटीएम पळवून नेण्याचा चोरट्यांच्या टोळीचा प्रयत्न पोलिसांच्या तात्काळ ॲक्शनमुळे फसला. पोलिसांनी पाठलाग सुरु केल्यामुळे चोरट्याने रस्त्यातच एटीएम फेकून पळ काढला. लासलगाव विंचूर रोडवर ॲक्सिस बँकेची शाखा असून त्यालगत एटीएम केंद्र आहे. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी एटीएम आणि त्यातील पंधरा लाख रुपयांच्या सोबत आणलेल्या कारमध्ये टाकून पळवून नेण्याचा प्रयत्न केला. ही घटना एटीएमच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. त्याचबरोबर बँकेच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयातही त्याचा अलार्म गेला. 


दरम्यान ही बाब बँक अधिकाऱ्यांच्या लक्षात येताच तिथल्या अधिकाऱ्यांनी लासलगाव पोलीस ठाण्यात माहिती दिली. त्यानुसार लासलगाव पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पुढे पोलिसांनी तातडीने नाकाबंदी करुन जलद तपास सुरु केला. पोलीस पथकाने खासगी वाहनाद्वारे या चोरट्यांचा पाठलाग सुरु केला. ही बाब लक्षात येताच चोरट्यांनी औरंगाबाद रोडवरील बोकडदरे शिवारात एटीएम मशीन पोलिसांच्या खाजगी वाहनाच्या दिशेने फेकून देत पळ काढला. एटीएमसह अंदाजे 15 लाख रुपये रोख रक्कम पोलिसांनी ताब्यात घेतली.


Maharashtra Nashik Crime : पोलिसांची तत्परता म्हणून... 


रस्त्यावरील अॅक्सिस बँकेचं एटीएम मशीन चार चोरट्यांनी फोडून चक्क ते मशीन अर्टिगा गाडीतून नेल्याची धक्कादायक घटना सोमवारी मध्यरात्री तीनच्या सुमारास उघडकीस आला. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी तातडीने नाकाबंदी करुन गाडीचा पाठलाग केला. चोरट्यांच्याही बाब लक्षात येताच त्यांनी घाबरुन गाडीच्या ब्रेकचा वापर करुन एटीएम मशीन पोलिसांच्या गाडीच्या दिशेने फेकलं आणि तिथून पळ काढला. दरम्यान या एटीएम मशीन आणि त्यातील अंदाजे 14 लाख 89 हजार 400 रुपयांची रोकड पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.


Maharashtra Nashik Crime : एटीएम मशीन टाकून पळाले.... 


लासलगाव ॲक्सिस बँकेची शाखा गावापासून दूर असल्याने येथे कोणताही सुरक्षा पथक रात्रीच्या वेळी नसल्याने आणि बँकेला कंपाऊंड गेट नसल्याने चोरट्यांना कमी वेळेत चोरी करता आली. चोरट्याने सर्वप्रथम काळ्या रंगाच्या स्प्रे एटीएम मशीन जवळील सीसीटीव्ही कॅमेरावर मारला. एटीएम मशीनला कोणतेही फाउंडेशन नसल्याने मशीन एकाने बाजूला ठेवले. त्याचबरोबर चौघांनी एटीएम मशीन उचलून सोबत असलेल्या अर्टिगा कारच्या मागच्या डिक्कीत ठेवण्यात येऊन त्यांनी पळ काढला. मात्र हे सर्व करत असताना बँक अधिकाऱ्यांना अलार्मच्या माध्यमातून धोक्याची सूचना गेली. त्यानुसार बँक अधिकाऱ्यांनी लागलीच स्थानिक पोलिसांनी माहिती दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठत हा प्रयत्न हाणून पाडला.