Maharashtra News : राज्यातील तापमान (Temperature) दिवसेंदिवस वाढत असून नाशिकसह (Nashik) विदर्भातील अकोला, अमरावती, वर्धा आणि उत्तर महाराष्ट्रातील जळगावात उष्णतेची लाट कायम आहे. याच उष्णतेने शनिवारी (13 मे) चार जणांचा बळी घेतल्याची घटना घडली आहे. नाशिक जिल्ह्यातील दोन तर एक छत्रपती संभाजीनगर आणि एक नांदेड जिल्ह्यात बळी गेला आहे.


नाशिक जिल्ह्यात (Nashik District) गेल्या चार दिवसांपासून पारा सातत्याने 40 अंश सेल्सिअसच्या आसपास असल्याने शनिवारी नाशिक तालुक्यातील राहुरी (Rahuri) येथे शेतकऱ्याचा तर मालेगाव जवळ एका ट्रक चालकाचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. तर छत्रपती संभाजीनगर आणि नांदेड जिल्ह्यात प्रत्येकी एकाचा बळी गेला आहे. साहेबराव शांताराम आव्हाड असे राहुरी येथील मयत झालेल्या व्यक्तीचे नाव असून अकोला येथील अकबर शहा मेहबूब मेहबूब शहा, नांदेड येथील विशाल रामदास मादसवार आणि पैठण तालुक्यातील तातेराव मदन वाघ असे मृत झालेल्या नागरिकांची नावे आहेत.


नाशिक जिल्ह्यातील देवळाली कॅम्प पोलिसांनी (Deolali Camp Police) दिलेल्या माहितीनुसार भर दुपारी शेतात काम करताना आव्हाड यांना अचानक चक्कर आली. गोरखनाथ यांनी त्यांना तातडीने उपचारासाठी देवळाली कंटोन्मेंट हॉस्पिटलमध्ये दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. मनीष होनराव यांनी साहेबराव यांना तपासून मयत घोषित केले. रखरखत्या उन्हात शेतात काम केल्याने उष्माघाताचा त्रास होऊन त्यांचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.


दुसऱ्या घटनेत मुंबई आग्रा महामार्गाने (Mumbai Agra Highway) मुंबईकडे डाळीचा ट्रक घेऊन जाणारा अकबर शहा मेहबूब शहा हा ट्रक चालक मालेगाव हॉटेल संयोगजवळ जेवणासाठी थांबला होता. यावेळी त्याला अस्वस्थता जाणवू लागली. त्यामुळे त्यांनी क्लीनरला याबाबत माहिती दिली. क्लीनरने हॉटेल मालकाला या संदर्भात सांगितलं असता त्यांनी चाळीसगाव फाट्यावरील रुग्णवाहिका तातडीने बोलावली. रुग्णवाहिका चालक राहुल पाटील यांनी अकबर शहाला सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. यावेळी तपासणी आणि त्यांचा मृत्यू झाल्याचे येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान चिकित्सेनंतरच मृत्यूचे निश्चित कारण समजू शकेल असे पोलिसांनी सांगितले आहे. दुसरीकडे मराठवाड्यात नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात उष्माघाताने दोन जणांना जीव गमावा लागला. हिमायतनगर येथील विलास रामराव मादसवार आणि पैठण तालुक्यातील आडुळ येथील तातेराव मदन वाघ यांचा मृत्यू झाला आहे.


अकोला जिल्ह्यात सर्वाधिक तापमान


राज्यात उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात येत आहे. राज्यात शनिवारी अकोला जिल्ह्यात 45.6 अंश तापमान नोंदवले गेले तर नाशिकमध्ये 38.76 मालेगाव 43.8 अंश तापमान नोंदवले गेले. राज्यात गट चार दिवसांपासून उष्णता वाढली असून गुरुवार आणि शुक्रवारी योजनेची लाट होती. शनिवारी काही भागात उन्हाची तीव्रता कमी झाली असली तरी पुढील काही दिवसात उष्णतेची लाट कायम असल्याचा सांगण्यात येत आहे.