Nashik Igatpuri News : नाशिक शहराची (Nashik) फॉग सिटी म्हणून ओळख असलेले इगतपुरी (Igatpuri) शहर पुन्हा एकदा आपल्या सौंदर्याची उधळण करण्यासाठी सज्ज झाले असून आज सकाळच्या सुमारास आलेल्या धुक्याच्या दुलईने शहर व्यापून गेले होते. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यातील निसर्ग पर्यटनाला धुक्याने सुरवात झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
सध्या जोरदार पावसाला सुरवात झाल्याने सगळीकडे हिरवा शालूं पांघरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. इगतपुरी शहर परिसरात अधून-मधून बरसलेल्या हलक्या आणि मध्यम सरींनंतर या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी इगतपुरीकरांनी ऋतुला कूस बदलताना पाहिले. शनिवारची सुरुवात पहाटेच्या दाट धुक्याने झाली. शहरातील बहुतेक भागांमध्ये धुक्याची दाट चादर पसरली होती. शहरातील उंच उंच इमारतींचे वरील मजले त्या धुक्यांवरुन डोकावत होते. पावसाळा आला की धुके पावसाच्या आगमनाची चाहूल घेऊन येते. यामुळे लवकरच पावसाचे जोरदार आगमन होण्याच्या शक्यतेने नागरिक आनंदात आहे.
नाशिक जिल्ह्य़ात इगतपुरी तालुक्यातच सर्वाधिक पावसाची नोंद होत असल्याने पश्चिम भागातील निसर्ग पर्यटन आता खुलू लागले आहे. हळूहळू छोटे धबधबे, घाटमाथा, डोंगर-दऱ्या सर्वत्र परिसर हिरवागार झाल्याचे दिसत आहे. कसारा घाटात पाऊस आणि धुक्याचा रंगणारा खेळ, भावली धरण परिसरातील धबधबे, वैतरणा मार्गावरील हिरवाईने नटलेला चौफेर प्रदेश, घाटनदेवी परिसर, वैतरणा या धरणांचा परिसर, कावनई अशा सर्वच ठिकाणी पर्यटकही येऊ लागले आहेत.
तर शहरात आज अनाहूतपणे आलेल्या या धुक्यामुळे मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता. सकाळी जसजसा सूर्योदय होत गेला तसतशी धुक्याची ही चादर अधिक ठळकपणे दिसू लागली. हे धुके एवढे दाट होते की काही काळ सूर्यनारायणही त्याआड झाकले गेल्याचे पाहायला मिळाले. शहरातील वाहतुकीवर फारसा परिणाम झाला नाही, परंतु उंचावर पाहिले असता शहरातील उंच इमारती आणि आसपासचा परिसर मात्र त्यात हरवून गेलेला पाहायला मिळाले. तर वातावरणातही नेहमीपेक्षा आल्हाददायक गारवा जाणवत होता.
इगतपुरी पर्यटन नगरी