Nashik News : ट्रॅक्टर चालवत असताना स्वतःच्या लहान मुलाला बाजूला बसवणे एका पित्याच्या अंगलट आले आहे. वडिलांनी ट्रॅक्टरवर बसवून दिल्यानंतर त्याच ट्रॅक्टर वरून पडून पाच वर्षीय चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नाशिक शहरातील ध्रुवनगर परिसरात घडली.


आपल्या पित्यासोबत ट्रॅक्टरमध्ये बसून जात असताना अचानकपणे पाच वर्षाच्या चिमुकल्याचा तोल गेला आणि चिमुकला रस्त्यावर कोसळला. यावेळी चिमुकला त्याच ट्रॅक्टरच्या पाठीमागील चाकाखाली सापडून जागीच ठार झाल्याची घटना घडली. राघव दिनकर शिंदे असे मृत झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे. ही घटना घडली, तेव्हा पिता दिनकर शिंदे हे ट्रॅक्टर चालवत होते. शहरातील शिवाजीनगर परिसरातील ध्रुवनगर येथे बारा बंगला भागात शिंदे चाळ आहे. या चाळीत राहणाऱ्या शिंदे यांनी ट्रॅक्टरला पाण्याचा टँकर जोडून ते आपला मुलगा राघव यास ट्रॅक्टरमध्ये व्यवस्थित बसवून निघाले. 


दरम्यान नियतीच्या मनात काही वेगळंच होत, वडिलांच्या जवळ शेजारी बसून काही अंतर ट्रॅक्टर पुढे गेला असता त्यावेळी रागावचा तोल गेला आणि तो खाली पडला. यावेळी ट्रॅक्टरच्या पाठीमागील डाव्या बाजूच्या चाकाखाली सापडून राघव गंभीरित्या जखमी झाला. त्याला दवाखान्यात हलविण्यापूर्वीच चिमुकल्याचा दुर्दैवी अंत झाला होता. या संपूर्ण घटनेने ध्रुवनगर सह शिंदे ताईचा परिसर हातरून गेला. 


याप्रकरणी राघवचे काका भैरवनाथ विश्वनाथ शिंदे यांनी गंगापूर पोलिसात फिर्याद दिली. मध्यरात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. दुर्दैवाने ही घटना घडली तेव्हा राघवचे वडील हे ट्रॅक्टर चालवत होते. त्यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधासह मोटार वाहन कायद्यान्वये गंगापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास वपोनी रियाज शेख यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक एस व्ही शेंडकर करत आहेत.


मुलांना जपा 
अलीकडे लहान मुलांना खेळण्यासाठी मोबाईल किंवा इतर साहित्य देणे नित्याचे झाले आहे. लहान मुलांना बाहेर किंवा मैदानात खेळणे कमी झाल्याचे दिसून येते. शिवाय मोटर सायकल, ट्रॅक्टर अशा वाहनावर बसविणे देखील चुकीचे ठरू शकते. याबाबत अनेक घटना देखील उघडकीस आल्या आहेत. त्यामुळे पालकांनी हौस म्हणून या सगळ्या गोष्टी टाळणे आवश्यक असते.