Nashik News : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील (Trimbakeshwar Taluka) धुमोडी परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात (Leopard Attack) मुलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अवघ्या आठ वर्षीय मुलीवर बिबट्यांने हल्ला चढविल्याने धुमोडी परिसरात दहशत पसरली आहे.
रुचिरा एकनाथ वाघ असे मृत झालेल्या बालिकेचे नाव आहे. नाशिक जिल्ह्यात निफाड, देवळा, इगतपुरी, दिंडोरी आदी परिसरात बिबट्याचा वावर आहे. मात्र आता बिबट्याने त्र्यंबकेश्वर तालुक्यातही आपला मोर्चा वळविल्याचे या घटनेवरून दिसून येते.
दरम्यान आरएफओ विवेक भदाणे यांनी दिलेल्या माहिती नुसार, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील मौजे धुमोडी गावच्या शिवारात मळ्यात राहत असलेल्या वाघ कुटुंबिय वास्तव्यास आहे. काल सायंकाळी रुचिरा ही घरी जेवण घेऊन जात असताना तसेच घराच्या परिसरात अंधार असल्याचा फायदा घेत बिबट्याने तिच्यावर झडप घातली. तिला बिबट्याने जबड्यात धरून फरफटत नेत जंगलात पळ काढला.
वाघ कुटुंबियांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी आरडाओरडा करून गावकऱ्यांना माहिती दिली. तसेच घटनेची माहिती वनविभागाला कळविण्यात आली. माहिती मिळताच वन परिक्षेत्र आधिकारी विवेक भदाणे हे पथकासह घटनास्थळी रवाना झाले. अंजनेरी, मुळेगावसह नाशिकचे वन कर्मचाऱ्यांचे अतिरिक्त पथकाला घटनास्थळी त्यांनी पाचारण केले. वनरक्षक, वन मजुरांसह गावकऱ्यांनी सुमारे चार ते साडे चार तास शोध घेतला.
यावेळी स्थानिकांसह वन अधिकारी, कर्मचाऱ्यांनी हातात बॅटऱ्या घेऊन सर्वत्र बलिकेचा शोध घेतला जात होता मात्र अंधार असल्याने बालिका आढळून येत नव्हती. अखेर 11 वाजता बलिकेचे शव गावापासून दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या झाडाझुडुपांमध्ये पडलेले दिसून आले. वन कर्मचाऱ्यांनी मृतदेह ताब्यात घेत पंचनामा करून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात हलविले.
परिसरात दहशत
सदरच्या घटनेने संपूर्ण धुमोडी पंचक्रोशीत दहशत पसरली असून मुक्त संचार करणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी होत आहे. दरम्यान, बिबट्याच्या प्रवण क्षेत्रात वनखात्याकडून रात्रीच पिंजरे तैनात करण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या होत्या.