Nashik Congress Letter : नाशिक शहर (Nashik) आणि जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ सह्यांची मोहीम राबवण्यात आली. राहुल गांधी यांचे संसद सदस्यत्व रद्द केल्याचा निषेध म्हणून ही मोहीम राबवण्यात आली. नाशिकच्या (Nashik) कॉलेज रोडवरील भोसला सर्कल येथे युवक काँग्रेसच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. 


अखिल भारतीय युवक काँग्रेसच्या (Congress) वतीने देशभरात पोस्ट कार्ड मोहीम  (Post Card Campaign) सुरु करण्यात आली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर सूडबुद्धीने केलेली कारवाई आणि मोदी-अदानी (PM Narendra Modi) यांच्यातील भ्रष्टाचारासंदर्भातील संबंध, यावर विविध प्रश्न त्या पोस्ट कार्डमध्ये विचारण्यात आले आहेत. पत्र लिहिण्यास कारण की आम्हाला सर्वांना काही प्रश्न सतावत आहेत, त्या प्रश्नांची उत्तरे आपल्याकडून अपेक्षित आहेत. अशा आशयाचे कार्ड पाठवण्यात आले आहेत. याचबरोबर तसेच देशातील वाढती महागाई, बेरोजगारी यावर जाब विचारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नाशिकमधून पाच हजार पोस्ट कार्ड पाठवले जाणार आहेत. विरोधी पक्ष संपवण्याची सूडबुद्धी या देशात सुरु असल्याचा आरोप युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आला. 


राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आल्याच्या निषेधार्थ काँग्रेसकडून (Congress Protest) निषेध व्यक्त करण्यात आला आहे. 2014 पासून मोदी सत्तेत आल्यापासून लोकशाही धोक्यात आली आहे. महाराष्ट्रातील जनतेला वेठीस धरण्याचे काम सुरु आहे. कुणीही सरकारविषयी बोलले तर त्याला शिक्षा करण्यात येत आहे. एकप्रकारे लोकशाही धोक्यात आली असून हुकूमशाहीकडे वाटचाल सुरु असल्याचे काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सांगितले. आज नाशिक काँग्रेसच्या माध्यमातून ;या हुकूमशाही विरोधात रस्त्यावर उतरलो आहे. लोकशाहीमार्गाने स्वाक्षरी मोहीम सुरु करुन हे आंदोलन करत आहोत. शेतकरी, कष्टकरी, व्यापारी, सामान्य जनता, विद्यार्थी या सर्वांना घेऊन हा लढा उभारला आहे. 


प्रत्येक प्रश्नाचे उत्तर पंतप्रधानांनी जनतेला द्यावे.... 


सध्या पोस्ट कार्डवर हे पत्र छापण्यात आले असून यात एकूण आठ ते नऊ प्रश्न विचारण्यात आले आहेत. या प्रश्नांच्या माध्यमातून जनतेच्या मनात काय चालू आहे? याबाबत सरकारला जाणीव करुन दिली आहे. जवळपास पाच हजार पोस्ट कार्ड पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवण्यात येणार आहेत. आज आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पोस्ट कार्ड पाठवली आहेत. ती मध्येच गहाळ होऊ देऊ नयेत. पोस्ट कार्डमधील प्रत्येक प्रश्नाचे उत्तर पंतप्रधानांनी जनतेला द्यावे. जोपर्यंत राहुल गांधी यांना न्याय मिळत नाही, जनतेला न्याय मिळत नाही तोपर्यत हा लढा सुरु राहिल, असा इशारा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष स्वप्नील पाटील यांनी दिला आहे. 


राहुल गांधी यांना जामीन मंजूर 


काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी काही वर्षांपूर्वी मोदी या आडनावावरुन कर्नाटक येथे टीका केली होती. त्यावरुन सुरतमध्ये राहुल गांधी यांच्याविरोधात भाजप नेत्यांनी याचिका दाखल केली होती. त्यामध्ये राहुल गांधी यांच्यावर मानहानीचा खटला सुरु होता. नुकताच त्याबाबत सुरत न्यायालयाने राहुल गांधी यांना दोषी ठरवत दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर राहुल गांधी जामीनासाठी अर्ज केला होता. त्यानंतर सुरत सत्र न्यायालयाकडून राहुल गांधी यांना जामीन मंजूर झाला आहे.