Nashik Fire : नाशिकच्या (Nashik) वाड्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला असून आठवडाभरात एक ना एक वाडा (Wada) किंवा वाड्याची भिंत कोसळल्याची घटना निश्चित घडत असते. अशातच पहाटेच्या सुमारास शहरातील फावडे लेन (Fawade Lane) मधील आंबेकर वाड्याला आग लागून लाखोंचे नुकसान झाल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नसल्याने परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. 


नाशिक शहरात जवळपास दोनशेहून अधिक धोकादायक वाडे आहेत. या वाडयांना पावसाळ्यापूर्वी नाशिक महापालिकेकडून (Nashik NMC) नोटिसा देण्यात येतात. मात्र तेवढ्यापुरते काही नागरिक वाडा खाली करतात. तर काहीजण धोका पत्करून वाड्यात वास्तव्य करतात. मात्र अनेकदा जीर्ण झालेले वाडे ढासळून वित्तहानीसांनी जीवितहानी होते. दरम्यान पहाटेच्या सुमारास जुन्या नाशिक परिसरातील फावडे लेनमधील आंबेकर वाड्याला आग लागल्याने एक दुचाकीसह तीन दुकाने व वाड्यातील राहत्या घराचे संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे. परिसरातील नागरिकांसह महापालिकेच्या अग्निशामक बंब व जवानांनी परिश्रम केल्यानंतर आग आटोक्यात आली. सुदैवाने त्यात जीवित हानी झाली नसली तरी लाखो रुपयांचा नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.


दरम्यान फावडे लेनमध्ये आंबेकर वाड्यात राजेंद्र अंबादास आंबेकर यांचे कुटुंब राहते. माजी महापौर यतीन वाघ संकुल समोर आंबेकर यांची तीन मजली लाकडी आणि विटाचे बांधकाम असलेल्या जुना वाडा आहे. या जुन्या वाड्यास पहाटेच्या सुमारास मोठ्या स्वरुपात आग लागली होती. आग लागली त्यावेळी घरामध्ये राजेंद्र अंबादास आंबेकर, त्यांचा मुलगा अनिरुद्ध आंबेकर हे होते. यावेळी घराला आग लागल्याचे समजतात दोघेही बापलेकांनी प्रसंगावधान राखून वाड्याबाहेर धाव घेतली. वाड्यामध्ये तळमजल्यावर मन्सूर पाटणवाला यांचे दुकान आहे, तर त्याच्या दुकानापाठीमागे दुसर्‍या घरात त्यांचे गोडाऊन होते. आगीचे सुरुवात त्या गोडाऊनमधूनच झाली असा अंदाज आहे. वाड्यामध्ये दुसर्‍या मजल्यावर मंगेश शामराव परदेशी यांच्या मालकीचे स्क्रीन प्रिंटिंगचा व्यवसाय होता.


लाखोंचे नुकसान 
दरम्यान वाड्याच्या खाली प्रिंटिंगचा व्यवसाय व इतर दुकाने तसेच आंबेकर कुटुंबातील संसारोपयोगी फ्रीज, टीव्ही आदीसह इतर वस्तू आगीत भस्मसात झाल्या आहेत. तसेच मंगेश परदेशी यांच्या मालकीचे स्क्रीन प्रिंटिंगचे मशिनरी, कॉम्प्यूटर, स्क्रीन पेंटिंगला लागणारे साहित्य, आणि टी-शर्ट आदी जळाले आहे. मन्सूर पाटणवाला यांच्या मालकीचे मोबाईल आर्ट आणि फोटो फ्रेम दुकानातील मागील बाजूला असलेल्या गोडाऊनमध्ये फ्रेमसाठी लागणारा रॉ मटेरियल संपूर्णपणे जळाल्याचे स्थानिकांनी सांगितले. तर आग भीषण असल्याने वाड्याच्या समोरच्या बिल्डिंगपर्यंत पोहचली. शिवाय पार्किंगमध्ये उभी असलेली मालकीची दोन दुचाकीही जळून खाक झाल्या. आगीवर मुख्यालय केंद्रावरील दोन बंब, पंचवटी केंद्राचा एक, पंचवटी विभागीय केंद्राचा एक बंब, नवीन नाशिक एक बंब, सातपूर केंद्राचा एक बंब अशा एकूण सहा बंबाच्या पाण्याच्या साहाय्याने आग आटोक्यात आणली.