Nashik Congress Protest : केंद्र सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेत अदानी उद्योग समूहावर केंद्राची विशेष कृपादृष्टी असल्याचा आरोप करत आंदोलन केले.   माजी मंत्री शोभा बच्छाव (Shobha Bachhav) यांच्यासह नाशिक (Nashik) शहर जिल्हा काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर पोलिसांनी शहर पोलिस आयुक्तांच्या प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.


केंद्रातील मोदी सरकारने (Modi Government) निवडक उद्योगपतींवर कृपादृष्टी दाखवत सामान्य माणसाचा कष्टाचा पैसा धोक्यात टाकताना अदानी उद्योग समूहामध्ये एलआयसी, स्टेट बँक ऑफ इंडिया व इतर सार्वजनिक क्षेत्रातील वित्तीय संस्थांना कोट्यवधी रुपये गुंतविण्यास मोदी सरकारने भाग पाडल्याचा आरोप केला आहे.  या गैरकारभाराची संसदीय समितीमार्फत चौकशी करावी, अथवा सर्वोच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशांच्या देखरेखीखाली या प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणी करत नाशिक शहर जिल्हा काँग्रेस (Nashik City Congress) कमिटीने सोमवारी एलआयसी भवनच्या आवारात आंदोलन केले होते. मात्र, या आंदोलनासाठी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी कोणतीही पूर्व परवानगी घेतली नसल्याचा ठपका ठेवत पोलिसांनी या प्रकरणात माजी मंत्री  बच्छाव यांच्यासह महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष शरद आहेर, प्रदेश प्रवक्ता हेमलता पाटील व बबलू खैरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.


काँग्रेसचे एलआयसी विरोधात आंदोलन 


दरम्यान अदानींच्या विरोधात काँग्रेस एलआयसी आणि स्टेट बँकेच्या शाखांसमोर आंदोलन करतंय. तर तिकडे संसदेतही या मुद्द्यावरून काँग्रेसने सरकारला घेरण्याचा प्रयत्न केलार आहे. हिंडनबर्ग रिसर्चने अदानी समूहाबद्दल दिलेल्या अहवालानंतर संसदेत काँग्रेस आक्रमक झाली. सर्व विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या बैठकीनंतर आंदोलन करण्यात येत आहेत. देशभरात आंदोलन करण्यात येत असून दोनच दिवसापूर्वी पुणे, नाशिकसार इतर शहरात आंदोलने करण्यात आली. नाशिकमध्ये आंदोलन केल्यानंतर पोलिसांनी संबंधितांवर गुन्हा दाखल केला आहे. कोणतीही पूर्वपरवानगी न घेता आंदोलन केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. 


हेमलता पाटील काँग्रेसच्या कोणत्या गटात?


नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने प्रदेश काँग्रेसमधील नेत्यांचे वाद चव्हाट्यावर आले आहेत. नवनिर्वाचित आमदार सत्यजित तांबे यांनी एबी फॉर्मवरून थेट प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना लक्ष्य केले. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना अडचणीत आणण्यासाठी षड्यंत्र रचल्याचा आरोप केला. त्यानंतर प्रदेश काँग्रेसच्या प्रवक्त्या डॉ. हेमलता पाटील यांनी द्विटरवर खंत व्यक्त करताना आता बाळासाहेबांची शिवसेना की नानासाहेबांची असा संभ्रम निर्माण झाला. सामान्य काँग्रेस कार्यकर्त्यांची व्यथा त्यांनी मांडली. पक्षनेत्यांचे दोन गट झाल्याने आता साहजिकच कार्यकर्त्यांनादेखील कोणत्या नेत्याला मान्य करावे, समर्थन करावे की विरोध असा प्रश्न निर्माण झाला आहे.