Nashik Crime : नाशिकच्या अन्न व औषध प्रशासनाने महत्वाची कारवाई केली असून शहरातून मुंबईला जाणाऱ्या ट्रक ताब्यात घेण्यात आला आहे. या ट्रकमधून प्रतिबंधित असलेला गुटखा वाहतूक करताना 16 लाख 58 हजार 560 हजार रुपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे.


नाशिकहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांमध्ये छुप्या पद्धतीने राज्यात बंदी असलेला पान मसाला व सुगंधी तंबाखूचा साठा वाहतूक होत असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन नाशिक कार्यालयाला मिळाल्यानंतर प्रशासनाने तातडीने पथक तयार करत नाशिक मुंबई हायवेवरून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या आईसर वाहनाचा पाठलाग करून केला. त्यानंतर सदरचे वाहन मुंबई आग्रा हायवेवरील बटरफ्लाय गार्डन जवळ अडवून ट्रकची तपासणी केली. तपासणी दरम्यान या ट्रकमध्ये माऊथ फ्रेशनरच्या गोण्यांमध्ये लपून प्रतिबंधित राजनिवास पान मसाला, विमल पान मसाला रजनीगंधा पान मसाला व सुगंधी तंबाखूचा सुमारे 16 लाख 58 हजार 560 रुपयांचा किमतीचा साठा वाहतूक करताना आढळून आला आहे. 


सदरचे वाहन हे इंदूरवरून मुंबईच्या दिशेने निघाले होते. मात्र बेकायदेशीर वाहतूक होत असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाला मिळाली. त्यानुसार त्यांनी पथक कार्यान्वित करून मोहीम सुरु केली. नाशिक शहरातून हे मुंबईच्या दिशेने निघालेले असताना नाशिक मुंबई मार्गावर बटरफ्लाय गार्डन जवळ वाहनाला अडवून कारवाई करण्यात आली. यावेळी नाशिक कार्यालयाचे अन्नसुरक्षा अधिकारी प्रमोद पाटील यांनी 16 लाख 58 हजार 560 रुपयांचा प्रतिबंधित अन्नपदार्थ साठा, 13 लाख 825 रुपयांचा माऊथ फ्रेशनरचा साठा व वाहनांची किंमत अंदाजे 15 लाख असा एकूण 44 लाख 59 हजार 385 किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अन्नसुरक्षा कायद्यांतर्गत उन्हा नोंदवण्यात आला आहे. 


दरम्यान ही कारवाई नाशिकचे सह आयुक्त गणेश परळीकर, सहाय्यक आयुक्त उदय लोहकरे, अन्नसुरक्षा अधिकारी प्रमोद पाटील, अन्नसुरक्षा अधिकारी अविनाश दाभाडे यांच्यासह गोपाळ कासार, विकास विसपुते यांच्या पथकाने केली असून याप्रकरणी वाहन चालक अरुण राठोड, क्लीनर सुनील मोर्या, मुकेश राठोड तसेच इतर संशयित नदीम गोलंदाज व दिलीप बदलानी यांना पोलिसांनी ताब्यात घेत अंबड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आले आहे


टोल फ्री क्रमांकारवर संपर्क साधण्याचं आवाहन
नाशिक विभागातील सर्व किराणा, पान टपरी अशा अन्न पदार्थाच्या व्यावसायिकांनी आपल्या दुकानातून प्रतिबंधित पदार्थाची विक्री करु नये. अन्न किंवा औषध संबंधात कोणतीही तक्रार असल्यास नागरिकांनी प्रशासनाच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन अन्न व औषध प्रशासन नाशिक विभागाचे सह आयुक्त गणेश परळीकर यांनी केलं आहे. मागील काही दिवसांपासून अन्न व औषध प्रशासनाने कारवाईचा तडाखा लावला आहे. ऐन दिवाळीत त्यांनी अनेक ठिकाणांवर कारवाई केली होती.