Jalgaon Grampanchayat : यंदाच्या ग्रामपंचायत निकालात (Grampanchayat Result) अनेक दिग्गजांना धक्के तर मिळाले शिवाय अनेक नव्या जाणत्या उमेदवारांची सरपंचपदी वर्णी लागली. अशीच एक घटना जळगाव (Jalgaon) जिल्ह्यात एरंडोल तालुक्यातील अंतूर्ली गावात घडली आहे. येथील बँड पथकात कलाकार असलेल्या कांतीलाल सोनवणे यांची सरपंच पदी निवड झाली असून सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे. 


राज्यभरातील सात हजाराहून अधिक ग्रामपंचायतींचा निकाल (Grampanchayat Election) काल घोषित झाला. त्याबरोबर अनेक नवख्या उमेदवारांनी विजयाचा गुलाल उधळला. यामध्ये अनेक उमेदवारांना राजकीय पार्श्वभूमी नसताना केवळ गावकऱ्यांच्या हिमतीवर निवडणूक लढवली अन निवडूनही आले. राज्यभरात अनेक उदाहरण यंदाच्या निवडणुकीत पाहायला मिळाले. तर जळगाव जिल्ह्यातही असच एक सरपंच पदाच उदाहरण पाहायला मिळाले. एरंडोल तालुक्यातील अंतुर्ली गावात बँड पथकात गाणे म्हणण्याचे काम करणाऱ्या युवक सरपंच झाला आहे.  


कांतीलाल सोनवणे (Kantilal Sonavane) असे या नवनिर्वाचित सरपंचाचे नाव आहे. कांतीलाल हा गावातीलच बँड पथकात गाणे गाऊन काम करतो. मात्र सरपंच पदाची निवडणूक लागली आणि अंतुर्ली गावाची जागा अनुसूचित जाती राखीव झाल्याने गावातील मित्र मंडळींनी त्यांना सरपंचपदासाठी आग्रह केला. दरम्यान कांतीलाल याने निवडणूक आपलं काम नाही, गाणं हेच आयुष्य म्हणत त्याने सुरुवातीला नकार दिला होता. मात्र मित्र खूपच आग्रह करीत असल्याने त्याने शेवटी उमेदवारी अर्ज भरला होता. काल लागलेल्या निवडणूक निकालात ग्रामस्थांनी त्यांना आणि त्यांच्या पॅनलला भरभरून मतदान केल्याने कांतीलाल सोनवणे यांची सरपंचपदाची लॉटरी लागली आहे. 


सरपंच पदाच्या निवडीनंतर सोनावणे म्हणाले कि, गेल्या काही वर्षात गावातील प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी झालो. बँड पथक असल्याने दुःखाच्या वेळी भजन, कीर्तन म्हणून दुखी कुटुंबाना सांत्वन देण्याचे काम केले आहे. शिवाय गावात कधीच कुणाबद्दल वाईट चिंतले नसल्याने गावातील लोकांनी कौल दिला असल्याचे ते म्हणाले. त्याचबरोबर ग्रामपंचायत निवडणुकीत लोकांनी आणि मित्रांनी सहकार्य केल्याने सरपंच पदावर जाऊन पोहोचलो. लोकांनी ज्या पद्धतीने आपल्यावर विश्वास दाखविला आहे. त्या बद्दल त्यांचे आपण ऋण मानून चांगल्या प्रकारची विकास कामे करणार असल्याचे कांतीलाल सोनवणे यांनी म्हटले आहे. एक गरीब कुटुंबात जन्माला आल्यानंतर आपण कधी सरपंच होऊ असा स्वप्नातही कधी विचार केला नव्हता. मात्र जनेतेने आपल्याला दिलेले हे प्रेम यामुळे आपण सरपंच झालो असलो तरी हा लोकशाहीचा विजय असल्याचे मत कांतीलाल सोनवणे यांनी व्यक्त केले आहे. 


ग्रामपंचायत पायरीला नतमस्तक... 
आज त्यांनी अंतुर्ली ग्रामपंचायतमध्ये जाऊन आपला पदभार स्वीकारला. यावेळी त्यांनी खुर्चीला आणि ग्रामपंचायतीच्या पायरीला नतमस्तक होऊन अभिवादन केल्याचं पाहायला मिळाले. आजही गावातील अनेक घरात जाऊन भाकरी खाऊ शकतो, आपला मुलगा स्वप्नात ही सरपंच होऊ शकेल असा विचार मनात आला नव्हता, मात्र गावातील लोकांनी आम्हाला साथ दिल्याने माझा मुलगा आज सरपंच झाल्याचं खूप आनंद झाला आहे. कांतीलाल गावातील लोकांच्या अपेक्षा पूर्ण करून चांगल करणार असल्याची प्रतिक्रिया कांतीलाल सोनवणे यांच्या मातोश्री सुमन सोनवणे यांनी दिली आहे. कांतीलाल हा गावातील चांगला तरुण म्हणून त्याची गावात ओळख आहे. तो गावातील सगळ्यांनाच आवडता असल्याने त्याने सरपंच पदासाठी उभ राहावें असे सगळ्यांना वाटत होते, तो चांगल काम करेल असा आमचा विश्वास आहे. म्हणूनच आम्ही त्याच्या पाठीशी उभे राहून त्याला निवडून दिल्याची प्रतिक्रिया ग्रामस्थानी दिली आहे.