Nashik Accident : एकीकडे ईदच्या (Eid) दिवशी नाशिकच्या (Nashik) 14 वर्षीय मुलाचा गंगापूर धरणात (Gangapur Dam) बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. त्यानंतर चांदवड तालुक्यात धक्कादायक घटनेत पिता पुत्रावर काळाने घाला घातल्याची घटना घडली आहे. ईद साजरी करुन निघालेल्या पिता पुत्राच्या दुचाकीला ट्रकने पाठीमागून धडक दिल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. 


नाशिकसह जिल्ह्याभरात काल अक्षय्य तृतीया आणि रमजान ईदचा (Ramzan Eid) सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. अशातच नाशिक (Nashik)  शहरात दुर्दैवी घटना समोर आली. पोहण्यासाठी गेलेल्या मित्राच्या ग्रुपमधील एकाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना ताजी असतानाच काळ सायंकाळच्या सुमारास चांदवड (Chandwad) तालुक्यातील शिंगवे शिवारातील लासलगाव-मनमाड (Lasalgaon) रस्त्यावर ट्रक व दुचाकीच्या अपघातात दुचाकीवरील दोघां बापलेकाचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यासीन इस्माईल कुरेशी आणि हुजेब यासीन कुरेशी अशी या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या बापलेकाची नावे आहेत. 


मनमाड (Manmad) येथील आययूडीपी येथील रहिवाशी असलेले यासीन इस्माईल कुरेशी आणि हुजेब यासीन कुरेशी हे बापलेक ईद सण साजरा करुन दुचाकीने निघाले होते. हे दोघेही दुचाकीने लासलगाव-मनमाड रस्त्याने मनमाडकडे येत होते. यावेळी चांदवड तालुक्यातील शिंगवे शिवारातील खडीक्रेशर समोर पाठीमागून भरधाव येणाऱ्या ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. ट्रकची धडक इतकी भीषण होती की यासीन आणि हुजेब दोघेही रस्त्यावर फेकले गेले. या अपघातात दोघांच्याही डोक्याला गंभीर इजा झाल्याने रक्तस्त्राव अधिक झाला. यातच त्यांचा मृत्यू झाला. सलमान मुन्सी कुरेशी यांनी चांदवड पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरुन  ट्रक चालक मोहम्मद जहांगीर अब्दुल गणी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


कुरेशी कुटुंबावर काळाचा घाला... 


दरम्यान अपघात झाल्यानंतर स्थानिकांनी तातडीने पोलिसांनी घटनेची माहिती दिली. त्यानुसार चांदवड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच अपघाताची माहिती कुटुंबियांना मिळताच त्यांनी तात्काळ रुग्णालयात धाव घेतली. एकीकडे सर्वत्र मुस्लिम बांधवांकडून मोठ्या उत्साहात रमजान ईदचा सण साजरा केला जात असताना दुसरीकडे कुरेशी कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. रमजान महिन्याच्या महिनाभर उपवास करुन सर्वत्र ईद साजरी करण्यात येत होती. दुसरीकडे कुरेशी कुटुंबीय ईद सणाच्या आनंदात होते. मात्र अपघाताची वार्ता समजताच त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. आणि क्षणातआनंदाचा क्षण दुःखात बदलल्याचे चित्र पाहायला मिळाले.