Nashik Farmers News : कांदा पिकाचा (Onion Issue) प्रश्न बिकट होत चालला असून शेतकरी मेटाकुटीला आला आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या अवकाळी पावसाने राज्यात धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. नाशिकमधील (Nashik) शेतकऱ्याने कांद्याला भाव मिळत नसल्याने पारंपारिक पिकात बदल करत टरबूजाची लागवड केली. मात्र त्यालाही कवडीमोल भाव मिळाल्याने शेतकरी पुरता हतबल झाला आहे.


काही दिवसांपूर्वी नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) शेतकऱ्याने भाव नसल्याने कांद्याचा अंत्यविधी केला होता. त्याआधी देखील कांद्याला हमीभाव मिळावा म्हणून अनेकदा आंदोलन (Protest) झाली आहेत. मात्र तरी देखील अद्यापही शेतकऱ्यांच्या पदरात पुरेसा पैसा येत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे आता शेतकरी हतबल होऊन परिस्थितीला सामोरे जात आहे. अशातच नाशिकच्या चांदवड तालुक्यातील वराडी गावातील शेतकरी नंदू भागवत पवार या शेतकऱ्याने सुरुवातीला कांद्याचे पीक घेतले, मात्र अवकाळी पावसाने दणका दिल्याने कांद्याचे नुकसान झाले. नुकसानीत वाचलेला थोडा फार कांदा बाजारात विक्रीस नेला. पण त्यालाही भाव मिळाला नाही.


दरम्यान, शेतकरी पवार यांनी कांद्याला भाव मिळाला नाही म्हणून निराश न होता टरबुजाची शेती करण्याचे ठरविलं. त्यानुसार शेततळ्यात शिल्लक असलेल्या थोड्याफार पाण्यात पारंपारिक शेती पिकांत बदल करत टरबूज पीक घेतले. त्यानुसार या शेतकऱ्याने एक एकरावर लावलेल्या टरबुजावर जवळपास एक लाखाहून अधिक खर्च केला. पीक निघालं, आता बाजारात न्यायची वेळ आली. टरबुजाला भाव मिळेल आणि आपले झालेले नुकसान वसूल होईल, अशी आशा शेतकऱ्याला असतांना टरबुजाचे भाव कमी झाल्याने शेतकऱ्यापुढे पुन्हा संकट उभं राहिले आहे. शेतात 20 ते 25 टन टरबूज उत्पादन पूर्णपणे तयार झालं मात्र पाहिजे तसा भाव  व्यापाऱ्याकडून मिळत नसल्याने उत्पादन खर्च देखील निघणे मुश्किल झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे.


घरातील मंडळींनी केलेले काम आणि मोल मजुरी तर वेगळीच..वातावरणात सारखा बदल होत असून टरबुजाची मागणी घटत असल्याने वेगळं उत्पादन घेवूनही शेतकरी हतबल झाला आहे. हाताशी आलेला कांदा अवकाळीने हिरावून नेला. धाडस करून पारंपारिक पिकात बदल करत टरबूज पीक घेतलं मात्र त्यालाही भाव मिळत नाही. कोणतंच पीक भरवशाचं राहिले नसल्याने शेतकऱ्याने करायचं तरी काय असा सवाल व्यथित झालेल्या शेतकऱ्याने केला आहे. माय-बाप सरकारने काहीतरी मदत करून शेतकऱ्याला उभारी देण्याची गरज असल्याचे शेतकरी नंदू पवार म्हणाले.