Nashik Onion Bappa : नाशिक (Nashik) शहरासह जिल्ह्यात मोठया उत्साहात लाडक्या बाप्पाचे (Ganpati Bappa) आगमन होत आहे. अशातच निफाडच्या शेतकऱ्याने कांद्याची (Onion Bappa) गणरायाची मूर्ती साकारली असून कांद्याला भाव मिळावा यासाठी शेतकऱ्याने गणरायाला साकडे घातले आहे. 


निफाड तालुक्यातील (Niphad)  नैताळे येथील कांदा उत्पादक शेतकरी संजय साठे (sanjay Nathe) यांनी कांद्यापासून गणेश मूर्ती तयार करून या गणेश मूर्तीची स्थापना केली आहे. राज्यातील राज्यकर्त्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. कांदा उत्पादक शेतकरी संजय साठे यांनी गणरायांच्या चरणी प्रार्थना करून राज्यकर्त्यांना सद्बुद्धी देऊन शेतकऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष देण्याचे साकडे या वेळी गणरायाला घातले.


तसेच राज्यात अनेक समस्या असून सर्वात मोठी समस्या शेतकऱ्यांना भेडसावत आहे. खतांचा तुटवडा, पिकांवर रोग, मालाला भाव मिळत नाही. कोरडा दुष्काळ, ओला दुष्काळ यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणावर आत्महत्या करीत आहे. शेतकऱ्यांच्या या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी संजय साठे यांनी कांद्यापासून तयार केलेल्या गणरायाच्या मूर्तीची स्थापना केली आहे. सध्या कांदा पिकाला कवडीमोल भाव मिळत आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेती व्यवसाय तोट्यात जात आहे.


गेल्या चार पाच वर्षापासून कोरोनाच्या काळात फार मोठा तोटा झाल्याने प्रत्येक शेतकऱ्याच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा आहे. त्यामुळे मुला मुलींचे लग्न, मुलांचे शिक्षण, घरातील वृध्द आई वडीलाचे आजार इतर खर्च करणे दुरापास्त झाले आहे.राज्यातील शेतकरी आत्महत्या जैसे थे आहे. दिवसेंदिवस होत असलेल्या शेतकरी आत्महत्या चिंतेची बाब असून  शासनाने यासाठी प्रयत्न केले पाहिजे. कांदा पिकासाठी कायमस्वरूपी आयात, निर्यात धोरण ठरवून त्यानुसार निर्यात, आयात करून शेतकऱ्यांना व देशातील ग्राहकांना योग्य दरात अन्नधान्य मिळावे, ह्यासाठी कायमस्वरुपी तोडगा काढला पाहिजे, अशी भावना कांदा उत्पादक शेतकरी संजय साठे यांनी व्यक्त केली आहे.


नाशिक शहरासह जिल्ह्यात बाप्पाचे आगमन 
गेली दोन वर्षे कोरोनामुळे शांततेत पार पडलेल्या गणेशोत्सव यंदा धुमधडाक्यात साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर आज सकाळपासून मोठ्या उत्साहात गणरायाचे आगमन सार्वजनिक गणेश मंडळासह घरोघरी होत आहे. त्याचप्रमाणे शेतकरी संजय नाठे हे नेहमीच प्रत्येक सन उत्सवात कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा आपल्या संकल्पनेतून मांडत असतात. यंदा नाठे यांच्या घरी कांद्याच्या रुपात बाप्पा अवतरले आहेत. यातून त्यांनी सरकारला कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा आक्रोश पोहचविण्याचा प्रयत्न केला आहे.