Nashik Malegaon News : मालेगाव तालुक्यातील (Malegaon) खडकी येथे विजेच्या धक्क्याने शेतकरी बाप लेकाचा दुर्दैवी मृत्यू (Death) झाल्याची घटना घडली आहे. दोघेही बापलेकांचा यामध्ये मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण गावात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे. कांद्याच्या शेतात काम सुरु असताना महावितरणच्या तारेला धक्का लागल्याने मुलगा समाधान कळमकर विजेच्या तारेला लटकला. वडिलांना लक्षात येताच ते मुलाकडे गेले असता त्यांनाही शॉक लागला. 


नाशिकच्या (Nashik) मालेगाव तालुक्यातील खडकी शिवारात (Khadki Shiwar) पांडुरंग कळमकर यांची शेतजमीन आहे. ते कांदा काढणीसाठी सहकुटुंब शेतात गेले होते. या दरम्यान समाधान कळमकर (samadhan Kalamkar) हा तरुण हा विहिरीवर पाणी घेण्यासाठी गेला होता. विहिरीजवळील विद्युत पेटीतील वायर तुटल्याचे दिसून आले. ती बाजूला करण्यासाठी गेला असता त्याला विजेचा तीव्र धक्का (Electric Shock) बसला. हा प्रकार पाहून वडिलांनी समाधानकडे धाव घेतली. मुलाला सावरताना त्यांनाही विजेचा धक्का बसला. यात दोघाही बापलेकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. यावेळी ही बाब कुटुंबियांच्या लक्षात येताच जोरजोरात आरडाओरड केली. आवाज ऐकून आजूबाजूच्या स्थानिक नागरिकांनी तात्काळ विहिरीकडे धाव घेतली. 


स्थानिक नागरिकांनी तात्काळ दोघांनाही बाजूला घेत वैद्यकीय उपचारासाठी मालेगाव येथील सामान्य दवाखान्यात नेले. परंतु डॉक्टरांनी तपासून त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. रात्री उशिरा खडकी परिसरात अत्यंत शोकाकूल वातावरणात दोघा पिता पुत्रावर अंत्यसंस्कार करण्यात आले. चार वर्षांपूर्वी समाधानच्या भावाचा पोळ्याच्या दिवशी पाण्यात बुडून मृत्यू झाला होता आणि आता समाधानसह वडिलांचा देखील मृत्यू झाल्याने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सदर घटनेने शेतशिवारातील गंभीर परिस्थिती समोर आली आहे. हेलावून टाकणारी घटना खडकी गावात घडली आहे. 


हृदय पिटाळून टाकणारी घटना 


दरम्यान जेमतेम परिस्थिती असताना जीवनाशी दोन हात करण्याची हिम्मत ठेवणाऱ्या कष्टकरी कुटुंबाला दुःखद प्रसंगाला सामोरे जावे लागले. शेतशिवारामध्ये आधीच अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला असताना कोणत्याही शेतमालाला भाव मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. यातच एक एक दिवस नवा संघर्ष सुरु असताना अशी घटना हृदय पिटाळून टाकणारी आहे. पिता पुत्राची एकाच वेळी चिता पेटवण्याची वेळ आल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. खडकी गावासह तालुका शोकसागरात बुडाला आहे. गावात फक्त रडण्याचा आवाज येत असून गाव सुन्न झाले आहे. दरम्यान महावितरणच्या गलथान कारभाराचा फटका बसल्याचा आरोप करत गावकऱ्यांनी कारवाईची मागणी केली आहे.


नांदगावमध्ये वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू 


सोमवारी मध्यरात्री विजेच्या कडकडाटासह झालेल्या अवकाळी पावसामुळे तालुक्यातील तांदूळवाडी येथील नाना गमन चव्हाण या शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू झाला. शेतात काढून ठेवलेले कांदे झाकण्यासाठी चव्हाण हे शेतात गेले असता अंगावर वीज पडून त्यांचा जागीच मृत्यू झाला. मध्यरात्री अचानक झालेल्या पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतात उभे असलेले गहू, हरभरा, कांदा या पिकांवर अवकाळीचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.