Nashik Farmers : नाशिक (Nashik) जिल्हा कृषी विभागाच्या (Agriculture Department) भरारी पथकातील अधिकाऱ्यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे दिंडोरी (Dindori) तालुक्यातील मौजे तळेगाव येथे सापळा असून 295 किलो लिटर बनावट कीटकनाशकांचा (Insecticide) साठा जप्त करण्यात आला आहे. सुमारे 6 लाख 16 हजार रुपये इतकी किमतीचे असून अल्पावधीतच झालेल्या दुसऱ्या कारवाईमुळे बनावट कीटकनाशक तणनाशक विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. 


नाशिक जिल्ह्यात द्राक्ष, भाजीपाला (Vegetables) मुख्य पीक असून हंगामाच्या सुरुवातीला शेतकऱ्यांकडून कीटकनाशकाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. अधिकृत कीटकनाशके विक्रेत्यांना व्यतिरिक्त शेतकऱ्यांना अनधिकृत व्यक्तींकडून कमी दरात बनावट कीटकनाशके उपलब्ध करून दिले जात असल्याचा संशय कृषी विभागात होता. त्या अनुषंगाने बुधवारी तळेगाव येथे सापळा रचून मे. नंदिनी किचन अप्लिकेशन ट्रॉली यांच्या आवारात संशयित कीटकनाशकांचा साठा जिल्हा भराई पथकाने जप्त केला आहे. विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, तंत्र अधिकारी संजय शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि विभागीय गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक जितेंद्र पानपाटील यांच्या सहकार्याने जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक अभिजीत घुमरे यांनी ही कारवाई केली. 


दरम्यान मागील महिन्यात ओझर (Ozar) येथील कारवाईत घेतलेले नमुन्यांचे अहवाल-अप्रमणित आले असून त्यामधील कीटकनाशकांचे घटक अत्यंत कमी प्रमाणात आहेत. सदर विनापरवाना बोगस कीटकनाशकांचा वापर शेतकऱ्यांनी केल्यास सदर नाशकांचा पीक संरक्षणासाठी कोणताही उपयोग होत नाही. शेतकऱ्यांनी विनापरवाना विक्री करणारे इसमाकडून कोणत्याही प्रकारची कीटकनाशक खरेदी करू नये असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. या प्रकरणी संशयित दीपक मोहन अग्रवाल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक अभिजीत घुमरे यांनी दिंडोरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 


कृषी विभागाचे आवाहन 
नाशिक जिल्ह्यात सद्यस्थितीत भात, टोमॅटोसह भाजीपाला लागवड करण्यात आली आहे. या पिकांसाठी शेतकरी खते, कीटकनाशके खरेदी करत असतो. मात्र बाजारामध्ये बनावट खत औषधांबरोबरच बनावट कीटकनाशके विकणाऱ्यांचा देखील  सुळसुळाट झाला आहे. खरिपासाठी शेतकऱ्यांना बी-बियाणे, खत-औषधे त्याबरोबरच कीटकनाशके यांची खरेदी करावी लागत असते. आधीच शेतीतून मिळणारे तुटपुंजे उत्पादन आणि खत बियाणे यांच्या मधून होणारी फसवणूक यातून शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान होते. ग्रामीण भागामध्ये हे अशा प्रकारचे प्रमाण फार वाढले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कृषी विभागाशी संपर्क साधून खते बी बियाणे याबाबत माहिती घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.