Nashik Crime : ज्या नाशिकमध्ये (Nashik) नोटा छपाईचा कारखाना आहे, त्याच नाशिक शहरात बनावट नोटांचे (Fake Money) रॅकेट उघडकीस आले असून बनावट नोटा पोलिसांनी जप्त केल्या आहेत. विशेष म्हणजे बनावट नोटा एका  इडली वाल्याकडे (Idli) आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. तब्बल पाच लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या असून पाचशे आणि दोन हजार रुपयांच्या तब्बल 244 पोलिसांनी जप्त केल्या आहेत. या बनावट नोटा बाजारात चलनात आणताना पोलिसांनी कारवाई केली आहे. 


अण्णा उर्फ मलायारसन मदसमय असे या अटक केलेल्या संशयित इडली वाल्याचे नाव असून ही व्यक्ती मूळ तामिळनाडू (Tamilnadu) राज्यातील तुदुकुडीतील रहिवासी असल्याचे समजते आहे. या व्यक्तीवर भारतीय चलनी नोटा नकली तयार करणे आणि त्या नोटा खरे चलन म्हणून बाजारात वापरणे या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अण्णाने नवरात्रोत्सवात नाशिकमधील कालिकेच्या यात्रेत बनावट नोटा देऊन काही छोट्या व्यावसायिकांची फसवणूक केल्याच तपासात उघड झाले आहे. या व्यक्तीकडून सद्यस्थितीत एकूण पाच लाख 8 हजार रुपयांच्या किमतीच्या बनावट नोटा 3300 रोख रक्कम आणि मोबाईल जप्त करण्यात आला आहे. 


दरम्यान काल सायंकाळी बनावट नोटांची विक्री करण्याच्या तयारीत असतांना भारत नगर परिसरात अण्णाच्या मुसक्या आवळल्या. बनावट नोटा बाजारात आणणारी टोळी नाशिक मध्ये कार्यरत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे काल रात्री भारत नगर परिसरातून पोलिसांनी या संशयित इडली वाल्याला अटक केली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक रौंदळ अधिक तपास करीत आहेत. 


नाशिकमध्ये इडलीवाल्यांचा सुळसुळाट 
नाशिक शहरात गेल्या अनेक वर्षांपासून परप्रांतीय राज्यातील अनेक इडलीवाले असून जागोजागी त्यांनी बस्तान मांडले आहे. असे असताना काल सायंकाळी नाशिक शहर परिसरातील भारत नगर परिसरात ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील इतर इडली विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत. अटक केलेल्या अण्णाची चौकशी सुरु असून पोलीस याबाबत पुढील कारवाई काय असणारा याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


बनावट नोटा कशा ओळखायच्या?
रोजच्या चलनातील नोटांवर महात्मा गांधी यांचे चित्र वॉटरमार्कच्या स्वरूपात दिसते. नोटेमध्ये सुरक्षा धागा असतो. यावर पृष्ठभागावर हिंदीमध्ये 'भारत' असे तर पार्श्वभागावर 'आरबीआय' असे लिहिलेले असते. हा सुरक्षा धागा महात्मा गांधींच्या चित्राच्या डाव्या बाजूला असतो. नोट डोळ्यांच्या पातळीत जमिनीला समांतर धरल्यास नोटेच्या पार्श्वभागी महात्मा गांधींच्या उजव्या बाजूला त्या नोटेचे मूल्य सांगणारे चित्र अस्पष्ट दिसते. अत्यंत सूक्ष्म अक्षरांत आरबीआय असे नोटेवर लिहिलेले असते. नोटेचा खरेपणा सिद्ध व्हावा यासाठी गव्हर्नरांची स्वाक्षरी छापताना ती सहज स्पर्शून जाईल अशी उन्नत छापलेली असते. त्याचप्रमाणे डावीकडे उन्नत स्वरूपात अशोकस्तंभही छापलेला असतो. प्रत्येक नोटेवर मूल्यानुसार ओळखचिन्ह असते. आयत, त्रिकोण, गोल अशा विविध आकारात हे चिन्ह नोटेवर ठळकपणे छापलेले असते. नोटेवरील क्रमांक फ्लुरोसंट शाईने छापलेले असतात.