Nashik Grapes : गेली दोन वर्ष द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत कठीण होती, मात्र यंदा नववर्षाची सुरुवातच द्राक्ष त्यांच्यासाठी चांगली झाली असून गेल्या दहाच दिवसात नाशिक (Nashik) जिल्ह्यातून 197 मेट्रिक टन द्राक्षाची एकट्या युरोप खंडात निर्यात (Export Grapes) झाली आहे, तर ईतरही देशात द्राक्ष जाऊन पोहोचली आहेत.
महाराष्ट्राचा देशामध्ये द्राक्ष (Grapes) उत्पादनात प्रथम क्रमांक असून नाशिकची ओळख तर द्राक्षपंढरी म्हणून आहे. नाशिक जिल्ह्यात 62 हजार 982 हेक्टर क्षेत्रावर द्राक्षाची लागवड केली जाते. त्यात निफाड, दिंडोरी, नाशिक आणि निफाड हे तालुके द्राक्ष घेण्यात अग्रेसर आहेत. विशेष म्हणजे राज्यातील 91 टक्के द्राक्ष निर्यात ही एकट्या नाशिक जिल्ह्यातून होत असून यंदा तर नवववर्षाच्या सुरुवातीलाच एकट्या युरोप खंडात गेल्या दहाच दिवसात नाशिक जिल्ह्यातून 197 मेट्रिक टन द्राक्ष जाऊन पोहोचल्याने शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त केलं जात आहे. 01 नोव्हेबर 2022 ते 08 जानेवारी 2023 पर्यंत जिल्ह्यातून 289.85 मेट्रिक टन द्राक्षांची युरोप खंडात तर 1027 मेट्रिक टन द्राक्षांची युरोप वगळता ईतर देशात निर्यात झाली आहे. युरोप खंडात नेदरलँड, जर्मनी, बेल्जीयम, युके आणि डेन्मार्क हे द्राक्षांची आयात करणारे मुख्य देश आहेत. तर युरोप वगळता ईतर खंडांचा विचार केला तर रशिया, युएई, कॅनडा, तर्की आणि चीन या देशातून द्राक्षांना मोठी मागणी होत असते.
कृषी विभाग जिल्हा अधीक्षक विवेक सोनवणे म्हणाले कि, यंदा निश्चितच चांगली निर्यात होईल, शेतकऱ्यानी देखिल निर्यातक्षम चांगली द्राक्षे घेतली आहेत. सव्वा लाखाहून अधिक मेट्रिक टन निर्यात होईल असा अंदाज आहे. रजिस्ट्रेशनची मुदत पण मार्च पर्यंत वाढवली असल्यानेही निर्यात वाढेल, मार्गदर्शन करण्यासाठी निर्यात कक्षही स्थापन केला असल्याचे ते म्हणाले.
महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ उपाध्यक्ष, कैलास भोसले म्हणाले कि, या वर्षी निर्यातीची सुरुवात चांगली आहे. गेल्या वर्षी 5 जानेवारीपर्यंत निर्यात शून्य होती. रशियालाही यंदा हळूहळू सुरुवात झाली असून जी गेल्या वर्षी युद्धामुळे थंडावली होती. यंदा द्राक्ष बागांना सूर्यप्रकाश चांगला मिळाला, दरही चांगला मिळाला आहे. वातावरण खराब होऊ नये, दरही असेच रहावे. चीनमध्ये आता कोरोनामुळे काय होते ते बघावे लागले. कोरोनाचा मोठा फटका बसला होता. खूप तोट्यात शेतकरी गेला, उत्पादन खर्च वाढत चालला. आता भाव मिळाला तर तो शेतकऱ्यांसाठी बॅकलॉग म्हणावा लागेल. 15 फेब्रुवारीनंतर आवक वाढल्याने दर कोसळतील, पण ते नियंत्रणात रहावे, अशी अपेक्षा भोसले यांनी व्यक्त केली आहे.
नाशिक जिल्ह्यातील हवामान द्राक्षबागांसाठी अनुकूल असून या वर्षी निर्यातीचे देखिल रेकॉर्ड ब्रेक होईल आणि सव्वा लाखाहून अधिक मेट्रिक टन द्राक्ष सातासमुद्रापार जाऊन पोहोचतील अशी आशा आहे. फक्त आता निसर्गाने साथ द्यावी आणि कोरोनासारखे कोणते नवे संकट पुन्हा ओढावू नये अशीच प्रार्थना शेतकरी करत आहेत. मागील दोन वर्षे आधी कोरोना आणि त्यानंतर रशिया युक्रेन युद्धाचा मोठा फटका द्राक्ष निर्यातीला बसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला होता. मात्र यंदा वर्षाची सुरुवात चांगली झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. 15 फेब्रुवारी नंतर निर्यातीचा खरा काळ सुरु होणार असून द्राक्षाला योग्य दर मिळावा, यात घसरण होऊ नये अशीच अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.
नाशिकमधून कोणत्या साली किती निर्यात?
दरम्यान मागील काही वर्षाचा आढावा घेतला असता 2018 पासून 2022 पर्यंत बारचे चढउतार द्राक्ष निर्यातीत पाहायला मिळाले. 2018-19 यावर्षात 1 लाख 46 हजार 113 टन, 2019-20 मध्ये 1 लाख 16 हजार 767 टन, 2020-21 मध्ये 1 लाख 26 हजार 912 टन, 2021-22 मध्ये 1 लाख 7 हजार 484 टन द्राक्षांची निर्यात झाली आहे.