Nashik Latest Marathi News update: नाशिक शहर परिसरात एकिकडे गुन्हेगारीच्या घटना वाढत असताना चोरट्यांना ताब्यात घेऊन पोलिसांकडून मुद्देमालही जप्त करण्यात येत आहे. पोलीस दलाच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत नाशिक शहर पोलिसांनी वेगवेगळ्या कारवाईत चोरांकडून जप्त केलेले सोने चांदीचे दागिने, मोटरसायकल, चारचाकी, मोबाईल, इतर असा एक कोटीहून अधिकचा मुद्देमाल तक्रारदारांना परत करण्यात आला.


नाशिक शहरात गुन्हेगारी वाढली असून दिवसाढवळ्या चोरी, हाणामारी, प्राणघातक हल्ले, लूटमार अशा घटना सातत्याने घडत आहेत. यामुळे नागरिक भीतीच्या सावटाखाली असताना नाशिक पोलिसांकडून काही अंशी का होईना गुन्हेगारीला लगाम घालण्याचा प्रयत्न सुरू आहेत. अशातच 1 कोटी 36 लाख 7 हजार 436 रुपये किंमतीचा जप्त मुद्देमाल फिर्यादीना परत केला आहे. यामध्ये सोन्याचांदीचे दागिने, मोटार सायकली, मोटार वाहन, मोबाईल फोन असा मुद्देमालाचा समावेश आहे.


पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी नाशिक पोलीस आयुक्तालय अंतर्गत असलेल्या पोलीस ठाणेच्या कार्यक्षेत्रात घडलेले मालमत्ता विषयक गुन्हे उघडकीस आणण्याच्या दृष्टीकोनातून मार्गदर्शनपर सुचना दिलेल्या होत्या. त्या अनुषंगाने मागील गेल्या वर्षाभरात दाखल मालमत्ते विषयक गुन्हे उघडकीस आले आहेत. या गुन्ह्यातील चोरलेला किंमती माल नाशिक पोलिसांनी हस्तगत केला आहे. यामध्ये त्यात 38 लाख 90 हजार 424 रुपयांचे सोने-चांदीचे दागिने, 25 लाख 70 हजार रुपयांच्या दुचाकी, 52 लाख 40 हजार रुपयांच्या चारचाकी, तीन लाख 20 हजार 269 रुपयांचे मोबाईल आणि 15 लाख, 86 हजार 770 रुपयांचा इतर माल याप्रमाणे एक कोटी 36 लाख, सात हजार 436 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. असा एकुण 01 कोटी 36 लाख 7 हजार 436 किंमतीचा मुद्देमाल वाटप करण्यात आला आहे. 


यापुर्वी देखील नाशिक पोलीस आयुक्तालय हद्दीतील मालाविरुध्दचे गुन्हे उघडकीस आणुन त्यातील जप्त मुद्देमाल 07 वेळा मुद्देमाल वाटपाचा कार्यक्रम घेवुन त्यामध्ये एकूण 7 कोटी 77 लाख 93 हजार 963 रुपये किंमतीचा मुद्देमाल फिर्यादी यांना परत करण्यात आलेला आहे.


नागरिकांकडून समाधान व्यक्त
दरम्यान न्यायालयात हा मुद्देमाल सादर केला असता न्यायालयाच्या आदेशानुसार सोमवारी समारंभपूर्वक पोलीस वर्धापन दिनाचे औचित्य साधत पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या हस्ते तक्रारदारांना पोलीस मुख्यालयातील कार्यक्रमात मुद्देमाल परत करण्यात आला. चोरीस गेलेला माल परत मिळाल्यामुळे तक्रारदार भारावून गेले होते. यावेळी महेश रुईक, विजय लाहोटी, नरेंद्र पवार, अश्विनी मोरे, सुनिता तिदमे, सुनील कर्डक आदींनी आपल्या भावना व्यक्त केला.