Nashik News : शिर्डीहून त्र्यंबकेश्वरसाठी (Trimbakeshwer) शिवशाही बस निघाली होती. मात्र वाटेत सिन्नरच्या (Sinnar) पांगरी गावाजवळ आली असता बंद पडली. यानंतर प्रवाशांना दुसऱ्या बसमध्ये अबसवून देण्यात आले. तर चालकाने बस नादुरुस्त झाल्याचे असंसिन्नर आगाराला कळविले. मात्र उशीर होऊनही दुरुस्तीसाठी पथक ना आल्याने महिला वाहक घटनस्थळावरुन निघून गेल्या. जेव्हा मध्यरात्री पथक नादुरुस्त बसजवळ आले, तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. 


एसटी महामंडळात (ST) कार्यरत असलेल्या बस चालकाने सिन्नर-शिर्डी महामार्गावर नादुरुस्त झालेल्या शिवशाही बसमध्ये आत्महत्या (Suicide) केल्याची घटना उघडकीस आली. पेठ तालुक्यातील दोनवडे येथील रहिवासी असलेले राजू हिरामण ठुबे (Raju Thube) असे बस चालकाचे नाव आहे. ते राज्य परिवहन महामंडळ नाशिक आगार 1 मध्ये कार्यरत होते. ठुबे हे शिर्डी येथून नाशिककडे (Nashik) बुधवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास शिर्डी-त्र्यंबकेश्वर बस घेऊन निघाले होते. शिवशाही (Shivshahi) वावी ते पांगरीदरम्यान शिंदे वस्तीजवळ नादुरुस्त झाली. महिला वाहकाने प्रवाशांना अन्य बसमध्ये बसवून दिल्यानंतर त्या निघून गेल्या. मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास सिन्नर आगाराचे वाहन दुरुस्ती पथक पांगरी शिवारात शिंदे वस्तीजवळ आले. याचवेळी चालक राजू ठुबे याने बसच्या पाठीमागच्या सीटवर हँडलला करगोट्याच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे दिसून आले. 


दरम्यान बस नादुरुस्त आल्याची माहिती समजल्यानंतर दुरुस्ती पथक मध्यरात्री 1 वाजता घटनास्थळी पोहोचले. मात्र, घटनास्थळी कर्मचाऱ्यांना दुबे याने आत्महत्या केल्याचे दिसल्यानंतर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. वावी पोलिसांना घटनास्थळी कोणतीही चिठ्ठी आढळून आली नसल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन लोखंडे यांनी दिली. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकलेले नाही. मात्र चालकाचा मोबाईल पुढील तपासणीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतला असल्याची माहिती सहाय्यक निरीक्षक लोखंडे यांनी दिली. नियंत्रण समितीचे उपमहाव्यवस्थापक नितीन मैद, विभाग नियंत्रक अरुण सिया, विभागीय वाहतूक अधिकारी किरण भोसले, आगारप्रमुख हेमंत नेरकर यांनी घटनास्थळी पाहणी केली. वावी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 


घडलेली घटना अतिशय धक्कादायक


सिन्नर आगारातील दुरुस्ती पथक सकाळपासूनच वेगवेगळ्या ठिकाणी नादुरुस्त असलेल्या बसच्या दुरुस्तीमध्ये व्यस्त होते. त्यामुळे शिवशाही बस दुरुस्त करण्यासाठी यायला रात्री उशीर झाला यादरम्यान चालक ठुबे यांनी नैराश्यपोटी की आणखी कोणत्या कारणामुळे टोकाचा निर्णय घेतला याबाबत पोलीस तपासात माहिती समोर येईल. घडलेली घटना अतिशय धक्कादायक असून दुपारी पावणेतीन वाजता बस नादुरुस्त झाली होती. मात्र सिन्नरमधील पथक चार ठिकाणी ब्रेकडाऊन असलेल्या वाहनांची दुरुस्ती करण्यात व्यस्त होते. त्यामुळे शिवशाही बस दुरुस्तीसाठी यायला उशीर झाला. यादरम्यान चालक ठुबे यांचा कोणाशी संपर्क झाला होता की नाही. याबाबत पोलीस तपासात माहिती समोर येईल. चालक ठुबे यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात परिवहन महामंडळ सहभागी आहे, अशी प्रतिक्रिया नाशिकचे विभाग नियंत्रक अरुण सिया यांनी दिली.