Nashik Trimbakeshwer : त्र्यंबकेश्वर मंदिराचा (Trimbakeshwer Mandir) वाद अद्यापही जैसे थे असून एकीकडे ग्रामस्थांकडून वादावर पडदा टाकण्यात आला असताना आता भाजपाचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी मंदिरात महाआरती करण्यात आली आहे. याचबरोबर मंदिर बचाव समितीच्या वतीने देखील आरती करण्यात आली आहे. यावेळी माजी आदिवासी मंत्री अशोक उईके हे देखील उपस्थित होते. 


मागील आठवड्यात देशभरात त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer) मंदिराचे प्रकरण चांगलेच गाजले. राज्यभरातून यावर प्रतिक्रिया उमटल्या असून अनेक नेत्यांनी भूमिका मांडल्याचे दिसून आले. दुसरीकडे गावकऱ्यांनी एकत्र येत बैठक घेत वाद मिटवण्यात आला. मात्र अद्यापही या प्रकरणावरून राजकारण सुरु असल्याचे चित्र आहे. अशातच आमदार नितेश राणे हे आज नाशिक दौऱ्यावर असून आज सकाळी त्यांनी त्र्यंबकेश्वर मंदिरात दाखल होत दर्शन घेतले. त्याचबरोबर विविध संघटनाच्या माध्यमातून मंदिरात महाआरती करण्यात आली. 


त्र्यंबकेश्वर मंदिराच्या (Nashik) उत्तरद्वारावर संदलनिमित्त काही आयोजकांनी धूप दाखविण्यासाठी मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता. यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. दरम्यान, धूप दाखविण्याची अनेक वर्षांची परंपरा असल्याचाही दावा केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर आज आमदार नितेश राणे, माजी आदिवासी मंत्री अशोक उईके हे त्र्यंबकेश्वर शहरात दाखल झाले. त्यांनतर मंदिरात सकाळी महाआरती करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी विविध हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने मंदिराच्या पायरीवर गोमूत्र टाकत शुद्धीकरणदेखील करण्यात आले होते. त्र्यंबकेश्वर मंदिर बचाव समितीच्या वतीने देखील सकाळी 10 वाजता महाआरती करण्यात आली आहे. या आरतीसाठी हिंदुत्ववादी संघटनेतर्फे हिंदू बांधवांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते. 


तुषार भोसले यांचे संजय राऊत यांना आव्हान 


त्र्यंबकेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वारावर संदलवेळी दाखविण्याची 100 वर्षांची परंपरा असल्याचा खासदार संजय राऊत यांनी केलेला दावा पूर्णतः खोटा असून ते दिशाभूल करीत असल्याचा आरोप भाजप अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत केला. त्र्यंबक मंदिर वादानंतर राऊत यांनी नाशकात माध्यमांशी बोलताना हा दावा केला होता. राऊत यांनी परंपरेचे जाहीरपणे पुरावे द्यावेत, असे आव्हान भोसले यांनी दिले आहे. याप्रकरणी ज्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल आहे, त्यापैकी एक संशयित सलमान अकील सय्यद याच्याविरुद्ध अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल असल्याचे भोसले म्हणाले. तर दोघा-तिघांचीही गुन्हेगारी पार्श्वभूमी असतानाही राऊत त्यांना पाठीशी घालत असल्याने त्यांचाही तुषार निषेध भोसले यांनी नोंदवला.