Blind Day : दिवाळीच्या (Diwali) सणाला आठवडा बाकी असला तरी मात्र नाशिकच्या (Nashik) एका शाळेत शुक्रवारीच दोन वर्षानंतर कोरोना निर्बंधमुक्त  (Corona) दिवाळी अगदी उत्साहात पार पडली.  विशेष म्हणजे या शाळेतील मुले सर्वसामान्यांपेक्षा खास असून तुम्हा आम्हा डोळसांचेही डोळे दिपवून टाकेल अशी ही दिवाळी साजरी झाली आहे. 


दिवाळी.. गोर गरीबांपासून ते श्रीमंतांच्या घरी हा दिव्यांचा उत्सव (Dipotasv) अगदी उत्साहात साजरा केला जातो. दिवाळीला अजून काही दिवस जरी शिल्लक असले तरी मात्र नाशिकमधील एका शाळेत शुक्रवारीच खास अशी दिवाळी साजरी झाली. आता तुम्ही म्हणाल की आकाशकंदील, रांगोळ्या, पणती, फटाक्यांची आतिषबाजी यात खास असं काय ?.. तर खास आहेत या मुली.. ही शाळा आहे ती नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाईंड अर्थातच नॅब (NAB) या संस्थेच्या अंध मुलींची. कोरोनामुळे गेली दोन वर्ष या मुलांना शाळेत दिवाळीचा आनंद लुटता आला नव्हता, मात्र यंदा अगदी सकाळपासूनच त्यांची तयारी सुरु झाली होती. संपूर्ण शाळेला आकर्षक रोषणाई करण्यात आली, प्रांगणात सुंदर अशी रांगोळी रेखाटली होती. प्रत्येक वर्गाबाहेर आकाशकंदील लावून पणती प्रज्वलीत करण्यात आली होती.    
 
अंध मुलींसोबतच बहुविकलांग अशा एकूण 90 मुला मुलींनी शाळॆत धम्माल मजा मस्ती केली. आनंद, उत्साह आणि जल्लोषाला ईथे कुठलीच कमतरता नव्हती. या मुलांना दृष्टी नसली तरी ते सर्वसामान्य मुलांपेक्षा किंबहुना त्यांच्याहून अधिक दिवाळीचा आनंद लुटतात. हातात सुरसुरी घेऊन दिन दिन दिवाळी म्हणतांना त्यांच्या चेहऱ्यावरील हावभावच खूप काही सांगून जातात. फटाक्यातील बॉम्बचे त्यांना मोठे आकर्षण असते त्यामुळे एखादा फटाका लावला कि तो कुठला आहे हे ओळखण्यासाठी जणू त्यांच्यात स्पर्धाच रंगलेली असते विशेष म्हणजे ही सर्व मजा लुटतांना मित्र मैत्रिणी, शिक्षक यांच्यासोबतच आपले आई वडीलही सोबत असल्याने त्यांचा आनंद गगनात मावेनासा झालेला असतो.
   
शाळेकडून या मुलांना एकप्रकारे प्रकाशाची भेट देण्यात आली आहे. दिवाळीची या मुलांना आता 15 दिवस सुट्टी मिळाली आहे. शाळेत चिवडा, चकली सोबतच शंकरपाळे, लाडू खाऊन तोंड गोड केल्यानंतर आई वडिलांसोबत आपल्या घरी ते जाणार आहेत, सुट्टीची मजा लुटल्यानंतर पुन्हा शाळेत येऊन आयुष्याशी आपला संघर्ष पुन्हा ते सुरु करणार आहेत. कोरोनाच्या दोन वर्षानंतर अगदी उत्साहात या मुलांनी दिवाळी साजरी केली. तिमिरातुन तेजाकडे नेणारी ही दिपावली या मुलांच्या आयुष्यातील अंधःकार दूर करो हिच काय ती देवाकडे प्रार्थना करण्यात येत आहे. 


आज पांढरी काठी दिन 


पांढरी काठी ही दृष्टीहीन बांधवांचा एक प्रकारचा अवयव जीवन रेखा भूमिका पार पाडते. अंध बांधवांना अंधकारमय जीवनातून मार्ग काढण्यासाठी पांढरी काठी नॅशनल असोसिएशन ऑफ ब्लाइंड संस्थेने बहाल केली आहे. अंध व्यक्तींना दिशा दाखवण्याचे काम ही पांढरी काठी करते. समाजाला अधिक संवेदन संवेदनाक्षम सहृदय होण्याचा एक प्रकारे संदेश पांढरे काठी देते. त्यामुळे दरवर्षी 15 ऑक्टोबरला हा दिवस साजरा केला जातो.