Dhule Crime : धुळे (Dhule) शहरातील देवपूर भागात लाखोंच्या गुटख्यावर काही दिवसांपूर्वी कारवाई करण्यात आली होती. ही घटना ताजी असतानाच आता आर्वी शिवारातून तालुका पोलिसांनी (Dhule Police) सुमारे नऊ लाख 93 हजार 180 रुपये किमतीचा अफू (Opium) जप्त केला आहे. या कारवाईत वाहनांसह तब्बल 17 लाख 93 हजार 180 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 


दोन दिवसांपूर्वी स्थानिक गुन्हे शाखेने धुळ्यातील (Dhule Crime) गुटखा माफियांच्या विरोधात धडक कारवाई केली. रविवारी सायंकाळी मुंबई-आग्रा महामार्गावर सापळा रचत 27 लाख रुपयांची गुटखा तस्करी रोखली, तर धुळे शहरातील देवपूर भागातून तीन लाख रुपयांचा गुटखा जप्त केला. या दोन्ही कारवाईत धुळे पोलिसांनी एकूण तब्बल 30 लाख रुपये किमतीचा गुटखा आणि मुद्देमाल जप्त केला. त्यानंतर धुळे तालुका पोलिसांनी आज केलेल्या कारवाईत नऊ लाखांचा अफू जप्त केला आहे. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. 


धुळे तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या आर्वी शिवारात काल रात्रीच्या सुमारास पेट्रोलिंग करीत असताना एका महिंद्रा कंपनीच्या गाडीतून अफूची वाहतूक केली जात होती हा मुद्देमाल मालेगाव कडे जात असल्याचे संशयास्पद रित्या पोलिसांना दिसून आल्यानंतर त्यांनी वाहन थांबवून तपासणी केली असता या वाहनात 18 गोण्यांमध्ये 331 किलो वजनाचा सुमारे नऊ लाख 93 हजार 180 रुपये किमतीचा मानवी मेंदूवर विपरीत परिणाम करणारा अफूच्या बोंडांचा चुरा भरलेला मिळून आला. यावेळी पोलिसांनी वाहन रस्त्याच्या बाजूला लावण्यात सांगितल्यानंतर चालक पळून जाऊ लागला. मात्र त्याचा पाठलाग करून त्याला पकडण्यात आले असून या कारवाईत सुमारे आठ लाख रुपये किमतीची महिंद्रा कंपनीच्या गाडीसह नऊ लाख 93 हजार 180 रुपये किमतीचा अफू जप्त करण्यात आला आहे. यात वाहनासह एकूण 17 लाख 93 हजार 180 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.


जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून मादक पदार्थांच्या तस्करीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असून मध्य प्रदेश राज्यातून गेल्या काही दिवसांपूर्वी गुटखा जप्त करण्यात आल्यानंतर तालुका पोलिसांनी केलेल्या अफूच्या कारवाईनंतर मादक पदार्थांची तस्करी रोखण्याचे आव्हान जिल्हा पोलिसांसमोर निर्माण झाले आहे मालेगाव कडे जाणारा हा नेमका कुठून आणण्यात आला होता आणि तो कुठे नेण्यात येणार होता याचा सध्या पोलीस तपास करीत आहेत.


काही दिवसांपूर्वीच लाखोंचा गुटखा जप्त 
धुळे शहरातील देवपूर भागात असलेल्या विट भट्टी परिसरातील एक इसम आपल्या एका पत्र्याच्या गोडाऊन मध्ये लाखो रुपयांचा गुटखा ठेऊन आहे याची खात्रीशीर माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे संशयित असलेला सलमान खान याच्या घराजवळच्या शेडची तपासणी केली असता त्यामध्ये तब्बल तीन लाख रुपये किमतीचा सुगंधित पान मसाला व गुटखा हा जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे आता अवैध्य गुटखा तस्करी करणारे आणि विक्री करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे. धुळे पोलिसांनी केलेल्या या कारवाईचे पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील यांनी कौतुक केले आहे.