Chhagan Bhujbal : नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गाची (Nashik-Mumbai Highway)  31 ऑक्टोबरपर्यंत सुधारणा झाली नाही तर 1 नोव्हेंबरपासून टोल बंद (Toll) करण्याचा इशारा राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी दिला आहे. नॅशनल हायवे अथोरिटी ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांना देत लोकांच्या संयमाचा अंत पाहू नका असा सज्जड दम त्यांनी दिला. छगन भुजबळ यांनी आज नॅशनल हायवेच्या (National Highway) अधिकाऱ्यांसमवेत नाशिक ते वडपे दरम्यान मुंबई महामार्गावरील रस्त्याची पाहणी करत अधिकाऱ्यांची कानउघडनी करत फैलावर घेतले.


मागील काही दिवसांत झालेल्या संततधार पावसामुळे नाशिक ते मुंबई रस्त्याची मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने अक्षरशः चाळण झाली आहे. त्यामुळे नाशिक मुंबई हा प्रवास अत्यंत खडतर आणि धोकादायक झाला आहे. नाशिकहून मुंबईकडे अनेक नागरिक खासगी वाहने ये जा करतात. तसेच अनेकजण बसेसनेही प्रवास करतात. मात्र दोन महिन्यांपासून पावसामुळे मुंबई नाशिक महामार्गाची चाळण झाली आहे. महामार्गावर खड्डेच खड्डे दिसू लागले आहेत. त्यामुळे वाहनधारकांना जीव मुठीत धारौन प्रवास करावा लागत आहे. शिवाय कुठला खड्डा टाळावा याचा विचार करत वाहन चालविले जात आहेत. त्यामुळे नाशिक-मुंबई या 200 किलोमीटर प्रवासासाठी नागरिकांना 5 ते 6 तासांचा वेळ लागत आहे. 


दरम्यान याच पार्श्वभूमीवर आमदार छगन भुजबळ यांनी महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसोबत नाशिक मुंबई महामार्गावरील खड्ड्यांची पाहणी केली. मुंबई आग्रा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे असल्याने अनेकांना अपघातात आपला प्राण गमवावा लागला. याबाबत छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच नॅशनल हायवे यांना याबाबत पत्र व्यवहार केला आहे. मात्र अद्यापही रस्त्यावर प्रचंड प्रमाणात खड्डे असल्याने आज छगन भुजबळ यांनी आक्रमक भूमिका घेत त्यांनी नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांसमवेत नाशिक ते इगतपुरी दरम्यान रस्त्याची पाहणी केली. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना 31 ऑक्टोबर पर्यंत रस्त्यांवरील खड्डे न बुजविल्यास 1 नोव्हेंबर पासून टोल बंद करण्याचा दिला.


गडकरींची घोषणाच!
तर विशेष म्हणजे वर्षभरापूर्वीच कार्यक्रमानिमित्त नाशिकमध्ये आलेल्या केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी नाशिक-मुंबई महामार्ग (Nashik-Mumbai Highway) काँक्रिटीकरणासाठी पाच हजार कोटी रुपये देणार असल्याची घोषणा केली होती. मात्र हि घोषणा घोषणाच राहिल्याचे सद्यःपरिस्थितीवरून दिसून येते. नाशिक ते मुंबई महामार्ग काँक्रिटीकरणासाठी 5 हजार कोटी निधी देणार असून नाशिक ते गोंदे हे काम तत्काळ करण्यात येईल व समृद्धी महामार्गाबरोबरच पुढील काम येत्या दोन ते अडीच वर्षांमध्ये पूर्ण करण्यात येईल, असेही गडकरी म्हणाले होते. नाशिक-मुंबई रस्त्याची दुरुस्ती महिन्याभरात होईल. नाशिक -गोंदे वडपे ही 99 किमीची सहा लेन मंजूर करु. दोन वर्षांत नाशिक- मुंबई प्रवास दोन तासांत होईल,असे आश्वासनही त्यांनी दिले होते.