Nashik News : अखिल भारतीय आखाडा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि आनंद आखाड्याचे प्रमुख स्वामी सागरानंद सरस्वती (Sagranand Sarasvati) यांचे आज पहाटे वृद्धापकाळाने निधन (Death) झाले. बस दुर्घटनेसंदर्भात नाशिकला (Nashik) आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी त्र्यंबकेश्वरला (Trimbakeshwer) भेट देत स्वामी सागरानंद सरस्वती यांचे अंतिम दर्शन घेत श्रद्धांजली वाहिली आहे. 


गेल्या काही महिन्यांपासून स्वामी सागरानंद सरस्वती आजारी होते. त्यांच्यावर नाशिकमधील (Nashik) एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. तर काही दिवसांपूर्वीच डॉक्टरांनी त्यांना घरी नेण्याचा सल्ला दिला होता. त्यांच्या आजारपणाच्या काळात आश्रमातील साधुमहंतांनी त्यांची मोठ्या प्रमाणावर सेवा केली. तसेच गेल्या सहा दशकांपासून त्र्यंबकनगरीच्या अध्यात्मिक क्षेत्रातील महान तपस्वी साधू म्हणून त्यांची ओळख होती. आज पहाटे वृद्धपकाळाने निधन झाले आहे. त्यानंतर दुपारी अडीच वाजेच्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी त्र्यंबकेश्वर येथील गणपतबारी परिसरात असणाऱ्या सागरानंद आश्रमात जाऊन सागरानंद सरस्वतींचे अंत्यदर्शन घेत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. 


दरम्यान, यावेळी सागरानंद यांच्या कार्याची माहिती महंत शंकरानंद सरस्वती गणेशनंद सरस्वती महाराज तसेच माजी नगराध्यक्ष कैलास घुले यांनी मुख्यमंत्र्यांना दिली. दरम्यान, त्र्यंबकेश्वरक्षेत्रासह विविध तीर्थ क्षेत्रावर त्यांना त्यांच्या कर्तृत्वामुळे मान होता. त्यांनी भारतातील मोठमोठ्या क्षेत्रावर यज्ञयाग व मुर्ती प्रतिष्ठित सहभाग घेतला होता. त्यांचे राजकीय व धार्मिक क्षेत्रात मोठया स्वरुपात अनुयायी व शिष्य आहेत. आज दुपारी चार वाजता रिंगरोड येथील आनंद आखाड्यात त्यांना समाधी देण्यात येणार आहे. 


स्वामी सागरानंद महाराजांचा परिचय
त्र्यंबकेश्वर आखाडा परिषदेचे माजी अध्यक्ष स्वामी सागरानंद सरस्वती महाराज हे 16 व्या वर्षांपासूनच शालेय शिक्षणात असतानाच अध्यात्मकडे ओढ होती. मूळचे नांदेड जिल्ह्यातील असलेले सागरानंद सरस्वती 1962 नंतर त्र्यंबकेश्वरला स्थायिक झाले. आले. काही दिवस संत गाडगेबाबा महाराज यांच्या सोबत टाळकरी म्हणून ते सहभागी होते. यातूनच त्यांचा वारकरी संप्रदायशी संबंध जुळून आला. सागरानंद सरस्वती यांनी पहिल्या कुंभमेळ्यापासून म्हणजेच 1968 पासून ते 2016 या काळात त्र्यंबकेश्वरच्या पाच कुंभमेळ्यामध्ये सहभाग घेतला. स्वामी सागरानंद सरस्वती हे त्यांच्या मनमिळाऊ स्वभावामुळे आबालवृद्धांमध्ये परिचित होते. सन 1989 पासुन कुंभमेळा व त्याचे महत्व यासाठी त्यांनी आखाडा परिषद महाराष्ट्रात स्थापन करुन क्षेत्राचे धार्मिक महत्व व परंपरा अव्याहतपणे टिकुन राहतील यासाठी अविरतपणे प्रयत्न केले.