Nashik News : गेल्या आठवड्यात भरभाव वाहनाच्या धडकेत अशोक स्तंभावरील जुना चांदवडकर वाडा कोसळल्याची घटना घडली. या घटनेनंतर महापालिकेनेही धोकादायक इमारती, घरे मोडकळीस आलेल्या या आक्रमक पवित्रा घेतला आहे. आता महापालिका आयुक्त (Nashik NMC) डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी संबंधित घरमालकाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. 


नाशिकमध्ये (Nashik) अनेक भागात जुने वाडे, इमारती अद्यापही पाहायला मिळतात. मात्र अनेक वर्षांपासून या वास्तू असल्याने जीर्ण अवस्थेत आहेत. त्यामुळे कधीही पडण्याची शक्यता लक्षात घेऊन नाशिक महापालिकेने (Nashik NMC) आता कठोर पाऊले उचलली आहेत. शिवाय काही दिवसांपूर्वी अशोकस्तंभ येथील चांदवडकर वाडा पडल्यानंतर धोकादायक वाड्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे पालिकेने या वाडेधारकांना कारणे दाखवा नोटीस बजावल्यानंतर आता थेट वाडा कोसळल्यास संबंधित जागामालकावरही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे निर्देश आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनी दिले आहेत. त्यामुळे आतातरी नाशिककरांनी धोकादायक वाड्यांसंदर्भात सजग राहून महापालिकेला सहकार्य करण्याचे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे. 


दरम्यान घरमालक आणि भाडेकरूंनी धोकादायक इमारती, घरे, वाडे स्ट्रक्चरल कन्सल्टंटची मदत घेऊन उतरवून घ्यावेत. कोणतीही जीवित व वित्तहानी होऊ नये याची काळजी घ्यावी. सदर इमारती त्वरित मोकळ्या कराव्यात, अन्यथा महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाचे कलम 268 नुसार पोलिसांमार्फत सदर इमारती मोकळ्या करून घेऊ, असा इशारा आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनी दिला आहे. याबरोबरच विभागीय अधिकाऱ्यांवरही जबाबदारी निश्चित करण्यात आली असून, वाडा कोसळून नुकसान झाल्यास त्यांच्यावरही कारवाई केली जाईल, असा इशारा डॉ. पुलकुंडवार यांनी दिला आहे


नाशिक महापालिकेकडून पावसाळ्यात शहरातील धोकादायक इमारती, घरे व मोडकळीस आलेल्या जुन्या वाड्यांना नोटिसा देण्याचे सोपस्कार पार पाडले जातात. मात्र, गंभीर घटना होईपर्यंत या इमारतीतील रहिवाशांना स्थलांतरित करण्यासाठी प्रयत्न होत नाहीत. त्यामुळे तत्कालीन प्रशासक रमेश पवार यांनी गेल्या वर्षी मे महिन्यातच धोकादायक इमारती, घरे, जुन्या वाड्यांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते. सर्वेक्षण करून 30 वर्षांपूर्वीच्या जुन्या इमारती, घरे, वाड्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या होत्या. पवार यांनी दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा नोटीस देऊनही वाडे खाली झाले नव्हते, मात्र आता डॉ. पुलकुंडवार यांनी काढलेल्या नव्या आदेशांमुळे आता थेट कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. 


महापालिकेकडून इशारा 


नाशिक शहरातील जीर्ण वाड्यांचा प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित आहे. दरवर्षी पावसाळ्याच्या तोंडावर महापालिका धोकादायक वाडे मालकांना नोटिसा बजावण्याचे सोपस्कार पार पाडते. परंतु दुर्दैवाने या वास्तु रिकाम्या करण्यासाठी पुरेसे प्रयत्न होताना दिसत नाहीत. काही दिवसांपूर्वी अशोक स्तंभावर आता वाडा कोसळून मोठे नुकसान झाले. त्यामुळे आता धोकादायक इमारती ना घरे, जुने वाडे नागरिकांनी त्वरित खाली करण्यासाठी जाहीर नोटिसा बजावल्यानंतर याबरोबरच विभागीय अधिकाऱ्यावरही कारवाई प्रस्तावित केली जाईल, असा इशारा दिला आहे.