Nashik Crime : नाशिक शहरातील खुनाचा सत्र काही केल्या थांबायचं नाव घेत नाही. आता पुन्हा एकदा नाशिकमध्ये खुनाची घटना समोर आली आहे. नाशिकच्या अंबड परिसरात एकाची चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना घडली आहे. 


नाशिकची औद्योगिक वसाहत असलेल्या अंबड परिसरातील किर्लोस्कर कंपनीजवळ हि घटना घडली आहे. नंदकुमार आहेर असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे. मागील अठरा दिवसांत आठवी हत्या असून यामुळे शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नाशिकची गलबजलेली अंबड औद्योगिक वसाहत नेहमीच चर्चेत असते. येथील आहेर इंजिनियरिंग कंपनीच्या गेटजवळ या कंपनी कर्मचाऱ्यावर अज्ञात तीन ते चार गुंडांनी धारदार शस्त्रांनी वार करत पळ काढला. या हल्ल्यात आहेर हे गंभीर जखमी झाले. मात्र हल्ला गंभीर असल्याने रक्तस्राव अधिक होत होता. यामुळे पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. 


आहेर हे इंजिनिअरिंग कंपनीमध्ये प्रोडक्शन मॅनेजर म्हणून कार्यरत असल्याचे समजते. दरम्यान घटनेची माहिती मिळताच नाशिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून गुन्हा दखल करण्याचे काम सुरु आहे. मात्र या घटनेने नाशिकची गुन्हेगारी किती फोफावत चालली आहे, हे यावरून दिसून येते. 


अठरा दिवसांत आठ हत्या 
नाशिक शहरात पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन करूनही काहीच बदल झाला नसल्याचे या घटनेवरून लक्षात येते. मागील 18 दिवसात 08 हत्या झाल्याने नाशिक हादरल आहे. तर गेल्या 02 दिवसात 03 जणांवर प्राणघातक हल्ले झाल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित राहिले आहे. 


दिवसाढवळ्या हत्यांचे सत्र 
गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरात गुन्हेगारांनी उच्छाद मांडला आहे. तर अनेक घटनांत किरकोळ कारणावरून खून झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. शिवाय या खुनाच्या घटना दिवसाढवळ्या झाल्याचे समोर आले आहे. संबंधित घटनेतील मयत हे कामावर जात होते. गाडीतून उतरत असताना त्यांच्यावर टोळक्याने हल्ला करत पळ काढला. तर दोन दिवसांपूर्वी आडगाव नका परिसरात मैदानावर एका टोळक्याने तरुणावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली.