Nashik Citylink : नाशिक महापालिकेची (Nashik NMC) सिटीलिंक बससेवा आजपासून पूर्ववत सुरु झाली असून गेल्या थकित वेतन, दंडाची आकारणी, बोनस यासह विविध मागण्यांसाठी सिटीलिंकच्या वाहकांनी तीन दिवसांपासून संप पुकारला होता, रविवारी कर्मचारी प्रतिनिधी, ठेकेदार, सिटीलिंक अधिकारी यांच्यात बैठक पार पडली, त्यात कर्मचाऱ्यांच्या मागण्या संदर्भात तोडगा काढण्यात आला, त्यानुसार आज (6 ऑगस्ट) सकाळपासून नाशिक सिटीलिंक बससेवा पूर्ववत झाली आहे. 


गेल्या तीन दिवसांपासून रखडलेल्या वेतनाची मागणी करत सुरु असलेला सिटीलिंक कर्मचाऱ्यांचा संप (Workers Protest) अखेर रविवारी सांयकाळी मिटला. या बैठकीत जून महिन्याचे वेतन 9 ते 10 तारखेपर्यंत आणि जुलैचे वेतन 31 ऑगस्टपर्यंत देण्याचा निर्णय घेण्यात आला असून दर महिन्याच्या 9 तारखेपर्यंत वेतन अदा करण्याचे, अन्यायकारक दंड आकारणी कमी करणे, कर्मचाऱ्यांना पेमेंट स्लिपसह जॉईनिंगचे लेटर देण्याचे, थकित बोनस आणि युनिफॉर्म बदलण्याविषयी वरीष्ठ पातळीवर चर्चा करण्याचे आश्वासन देण्यात आलं आहे. त्यांमुळे संप मागे घेण्यात आला. मात्र वारंवार होणाऱ्या संपामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय होत असल्याने पुन्हा संप नको अशी भावना प्रवासी व्यक्त करत आहेत


नाशिक महापालिकेने (Nashik Citylink Bus) दीड वर्षांपूर्वी मोठा गाजावाजा करत सुरु केलेल्या सिटीलिंक बससेवेला संपाचे ग्रहण लागले आहे. वाहकांना गेल्या दोन महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने तसेच मोठ्या प्रमाणावर दंड केल्याने सिटीलिंकच्या वाहकांनी शुक्रवारपासून (4 ऑगस्ट) बेमुदत संपाची हाक दिली होती. शहर बससेवा ठप्प झाल्याने विद्यार्थी, कामगारांसह सर्वसामान्य प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. बसेस बंद असल्यामुळे रिक्षाचालकांकडून प्रवाशांची अर्थिक लूट करण्यात येत होती. दरम्यान, संपाच्या पार्श्वभूमीवर सिटीलिंकच्या कार्यालयात बैठक झाली. या बैठकीत कर्मचाऱ्यांनी आपल्या वेतनासह विविध अडचणी मांडल्या. यावेळी कर्मचाऱ्यांचे सर्व अडचणी समजून घेत प्रलंबित वेतन अदा करण्याबरोबर, कर्मचाऱ्यांना आकारलेला दंड, पीएफ- ईएसआयची रक्कम, पेमेंट स्लिप आदींबाबत अखेर तोडगा निघाल्याने कर्मचाऱ्यांकडून संप मागे घेण्याची घोषणा करण्यात आली. 


आता संप करु नका... 


दरम्यान कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतल्याने आज सकाळपासून रस्त्यावर सिटीलिंक बसेस धावण्यास सुरुवात झाली. अखेर संप मिटल्याने प्रवाशांसह सिटीलिंक प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. सिटीलिंकच्या माध्यमातून रोज 75 हजार प्रवासी आणि 20 हजार विद्यार्थी प्रवास करतात. या प्रवाशांच्या माध्यमातून सिटीलिंकला रोज सरासरी 25 लाखांचे उत्पन्न प्राप्त होत असते. मात्र वाहकांनी संप पुकारत तीन दिवस शहरातील प्रवाशांना वेठीस धरले. सिटीलिंकच्या कर्मचाऱ्यांकडून गेल्या दोन वर्षात पाच वेळा संप पुकारण्यात आला आहे. वांरवार असे संप होत असल्याने याबाबत ठोस निर्णय घेण्याची मागणी आता प्रवाशांकडून केली जात आहे.


संबंधित बातमी : 


Nashik Citylink Bus : दोन महिन्यांचा पगार रखडला, साप्ताहिक सुट्टीही नाही, नाशिक सिटीलिंक कर्मचाऱ्यांचा संप सुरुच