Chhagan Bhujbal : बेळगावात (Belgaum) कन्नडी गुंडांनी महाराष्ट्राच्या गाड्यांवर केलेल्या हल्ल्याच्या निषेध नोंदवत महाराष्ट्राकडे (Maharashtra) वाकड्या नजरेने पाहाल तर याद राखा असा सज्जड दम माजी मंत्री छगन भुजबळ यांनी कर्नाटक सरकारला दिला आहे. बेळगाव, कारवार, बीदर, भालकी इत्यादी गावे महाराष्ट्राला द्या आणि नंतर कांगावा करा असा सज्जड दम हि भुजबळांनी दिला आहे. 


कर्नाटक सरकार महाराष्ट्राची गावे घेण्याची घोषणा करत आणि महाराष्ट्रातील सरकार बघ्याची भूमिका घेत आहे. महाराष्ट्र सरकारने आता भूमिका घेतली पाहिजे अशी मागणी करतानाच केंद्राने देखील यात हस्तक्षेप करून कर्नाटक सरकारला कडक समज दिली पाहिजे अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. हे प्रकरण कोर्टात असताना या प्रकरणाला चिथावणी कोण देत आहे, याची माहिती देखील घेतली गेली पाहिजे. यावेळी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी जर कर्नाटकाने गुंडगिरी थांबवली नाही तर पुन्हा एकदा गनिमी कावा दाखवावा लागेल असा इशारा दिला आहे. 


दरम्यान राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी कर्नाटक सरकारवर आगपाख केली असून राज्य सरकारने भूमिका घेणे गरजेचे होते, मात्र ती घेतली जात नाही. आज हल्ले झाले, त्यामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. येत्या 24 तासात वाहनावरील हल्ले थांबले नाहीत तर एक वेगळी भूमिका घ्यावी लागेल आणि जे होईल त्याला कर्नाटक सरकारचे मुख्यमंत्री जबाबदार असतील, असा इशारा शरद पवारांनी दिला. तर भुजबळ म्हणाले, इतर गावांची मागणी करणाऱ्या कर्नाटकने अगोदर महाराष्ट्राची बेळगाव, कारवार, बीदर, भालकी इत्यादी गावे महाराष्ट्राला द्या आणि नंतर कांगावा करा ही दादागिरी आणि गुंडगिरी महाराष्ट्र खपवून घेणार नाही मराठी माणसाला त्याचे उत्तर देता येत नाही, असे नाही पण महाराष्ट्राच्या संयमाचा अंत कर्नाटकने पाहू नये असे मत देखील त्यांनी व्यक्त केले. बेळगावसह कर्नाटकातील मराठी माणसांसोबत आम्ही नेहमीच आहोत असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.


महाराष्ट्राच्या ट्रकवर दगडफेक
कन्नड संघटनांनी महाराष्ट्राच्या सहा ट्रकवर दगडफेक केली. हिरेबागवाडी टोल नाक्यावर कन्नड रक्षण वेदिके या संघटनेकडून ही दगडफेक करण्यात आली. यावेळी काही कार्यकर्त्यांनी ट्रकवर झेंडे मिरवले. त्याशिवाय, महाराष्ट्राच्या ट्रकला शाईदेखील फासण्यात आली आहे. पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. कन्नड संघटनांच्या या दगडफेकीनंतर कर्नाटक सरकारने कारवाई करावी अशी मागणी राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी केली. त्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना फोन करुन निषेध व्यक्त केला. सर्वच स्तरावून या घटनेचा निषेध केला जात असून छगन भुजबळ यांनी देखील कर्नाटक सरकारला कडक शब्दांत सुनावले आहे.