Nashik Rain Update : नाशिक (Nashik) शहरासह जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये शुक्रवारी ते मंगळवारपर्यंत अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे शेतपिकांना पुन्हा एकदा मोठा फटका बसला. जिल्हाधिकारी (Nashik collector) गंगाधरण डी. यांनी जिल्हा कृषी अधीक्षक, प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकाऱ्यांसोबत व्हीसीद्वारे गुरुवारी (13 एप्रिल) संवाद साधला. यावेळी अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या तालुक्यांमधील शेतपिकांचे (Crop Damage) वेगाने पंचनामे पूर्ण करण्याचे आदेश दिले.


नाशिक जिल्ह्यात (Nashik District) मार्च महिन्यापासून बेमोसमी वादळी सरी कोसळत असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. 15 ते 19 मार्चदरम्यान झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील तेरा तालुक्यांमधील 460 गावांमधील 18 हजार 190 शेतकऱ्यांच्या शेतपिकांचा चिखल झाला होता. याबाबत जिल्हा कृषी विभाग व जिल्हा प्रशासनाने संयुक्तरीत्या बांधावर पोहोचत नुकसानीची पाहणी करून पंचनामे पूर्ण केले होते. याबाबत शासनाकडे सविस्तर अहवाल जिल्हाधिकारी यांनी पंधरवड्यापूर्वीच सादर केला. या अहवालात 14 कोटी 10 लाख 21 हजार रुपयांच्या अनुदानाची मागणी करण्यात आली होती. 


पुन्हा जिल्ह्याला अवकाळीचा फटका बसला आहे. मागील अवकाळी पावसात इगतपुरी, निफाड, सिन्नर, दिंडोरी, कळवण, नाशिक, देवळा, मालेगाव. सटाणा, बागलाण, चांदवड, पेठ, त्र्यंबकेश्वर या तालुक्यांना अवकाळी पावसाने जोरदार फटका दिला आहे. या तालुक्यामधील बहुतांश गावामधील शेतपिकाची नासाडी झाली आहे. या तालुक्यांचे पंचनामे पूर्ण केले होते.यामुळे पुन्हा कृषी विभाग व जिल्हा प्रशासनाला जिल्हाधिकारी यांनी तातडीने या चार ते पाच दिवसांमधील शेतीच्या नुकसानीचे पंचनाम्यांचे प्रगतिपथावर असलेले काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सर्व तालुका कृषी अधिकाऱ्यांसोबत तहसीलदार, प्रांताधिकारी यांनी समन्वय राखून तातडीने अहवाल सादर करावा, अशा सूचना गंगाथरण डी. यांनी दिल्या आहेत.


पुढील दोन दिवस पावसाचे!


नाशिक जिल्ह्यासाठी 12 ते 15 तारखेपर्यंत पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. शुक्रवार (14 एप्रिल) रोजी पावसाचा 'यलो अलर्ट' दर्शवण्यात आलेला आहे. शनिवारी (15 एप्रिल) देखील पावसाची शक्यता नाकारता येत नाही. वादळी वाऱ्यांसह विजांचा कडकडाट देखील अपेक्षित असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. दरम्यान नाशिक सह जिल्हाभरात अवकाळी पावसाने मागच्या आठवड्यात कहर केला होता. या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाल्याचे पाहायला मिळाले. शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावला. नाशिक जिल्ह्यात जवळपास 18 हजार 190 शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे नुकसान झाल्याचं कृषी विभागाच्या आकडेवारी समोर आले आहे. तर जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत केलेल्या अहवालानुसार जवळपास 14 कोटी घेऊन अधिक रुपयांच्या अनुदानाची आवश्यकता असल्याचे अहवालात म्हटले आहे. तर जिल्ह्यातील तेरा तालुक्यांमध्ये 407 गावांना अवकाळी चा फटका बसला आहे.