Nashik Rain : गेल्या आठवड्यात नाशिकसह (Nashik) जिल्हाभरात अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) हजेरी लावली. अवकाळी पावसाने अनेक भागातील रब्बी पिकांचे नुकसान केले. अशातच पुन्हा एकदा सोमवारपासून जिल्ह्यात (Nashik District) अवकाळी पावसाची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा एकदा पिकांच्या नुकसानीला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.
राज्यातील वातावरणात सातत्याने (Climate Change) बदल होत असून काही दिवसांपूर्वी ढगाळ हवामानासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. नाशिक शहरासह जिल्हाभरात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या (Farmers) तोंडचे पाणी पळवले. त्यानंतर काहीसा दिलासा मिळताना पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे आगमन होण्याची शक्यता आहे. हवामान तज्ज्ञांनी दिलेल्या अंदाजानुसार सोमवारपासून म्हणजेच 13 ते 15 मार्चदरम्यान राज्याच्या काही भागात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस (Rain) पडण्याची शक्यता आहे.
मागील आठवड्यात पडलेल्या अवकाळी पावसाने अनेक शेतकऱ्यांच्या गहू पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने बळिराजावर संकट कोसळले आहे. त्यातच हवामानतज्ज्ञांनी सोमवार, 13 ते शुक्रवार, 17 मार्चपर्यंत पाच दिवस महाराष्ट्रात (Maharashtra) तुरळक ठिकाणी विजा, गडगडाटीसह पावसाची शक्यता असल्याचा अंदाज वर्तविला आहे. विशेषतः 15 ते 17 मार्चच्या दरम्यान वातावरणाची तीव्रता अधिक जाणवते. या आठवड्याच्या काळात दिवसाच्या कमाल तापमानातही 2 अंशांनी घट होण्याची शक्यता जाणवते. जमिनीपासून साधारण 3 ते 7.5 किमी अशा साडेचार किमी हवेच्या जाडीत मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मध्य प्रदेशापासून उत्तर प्रदेशापर्यंत त्या पातळीतून जाणाऱ्या हवेच्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे अरबी व बंगालच्या उपसागरातून खेचल्या जाणाऱ्या आर्द्रतेमुळे इतर राज्याबरोबर महाराष्ट्रात पावसाची शक्यता जाणवते, असे हवामान विभागाने म्हटले आहे.
गव्हाच्या पिकावर परिणाम होण्याची शक्यता
नाशिक जिल्ह्यातील काही भागात यावर्षी गव्हाची पेरणी (Wheat Crop) उशिरा झाल्यामुळे अनेक भागातील गहू अद्याप हिरवा आहे. हा गहू काढणीस येण्यासाठी किमान 15 दिवस ते महिनाभराचा कालावधी लागणार आहे. अनेकांच्या गव्हाची वाढ मोठ्या प्रमाणात झाली आहे. यामुळे पाऊस झाला तर गव्हावर परिणाम होऊन उत्पादन घटण्याची चिता शेतकऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे. मागील आठवड्यात पडलेल्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण होणे अद्याप बाकी असतानाच हवामान तज्ज्ञांनी उद्या, सोमवारपासून पुढील पाच दिवस पावसाचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष, कांदा उत्पादकांबरोबरच ज्यांचा गहू अद्याप शेतात आहे असे शेतकरी धास्तावले आहेत. शिवाय अनेकांचे गहू हे काढणीला आले असल्याने पावसामुळे नुकसान होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मागील काही वर्षांपासून जिल्ह्यात सातत्याने अवकाळी पाऊस हजेरी लावत असल्याने दरवर्षी शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागत असतो.