Nashik Crime : नाशिक (Nashik) जिल्ह्यातील सिन्नर घोटी महामार्गावर (sinner Ghoti highway) एक खळबळजनक घटना समोर आली आहे. अपघात स्थळापासून जवळपास तीन किलोमीटर अंतरावर कार चालकाचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.  मयताचे नाव आकाश मोहन खताळे असून तो नाशिकचाच रहिवासी असल्याचे समोर आले आहे. 


नाशिक जिल्ह्यातील सिन्नर (sinner) जवळील घटना असून घोरवड गावाजवळ एक कार काठडा तोडून रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतातील विहिरीजवळ असलेल्या खड्ड्यात कोसळली होती. स्थानिक नागरिक आणि पोलिस घटनास्थळी पोहोचताच कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचं दिसून आलं. मात्र कार जवळ पाहणी करण्यात आली असता एक शर्ट वगळता कुठलीही व्यक्ती तिथे आढळून आली नाही. दरम्यान या घटनेचा तपास सुरू असतानाच शनिवारी सकाळी घटनास्थळापासून जवळपास तीन किलोमीटर अंतरावर संबंधित कार चालकाचा मृतदेह जखमी अवस्थेत दिसून आला. येथील एका हॉटेलसमोर रसवंती गृहाच्या पत्र्याच्या शेडमध्ये लोखंडी अँगलला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिक (Nashik) येथील अंबड भागात राहणाऱ्या चोवीस वर्षीय युवकाने सोनांबे शिवारातील गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना शनिवारी पहाटे उघडकीस आली. मात्र, या युवकाची कार त्याने फास घेतलेल्या ठिकाणापासून सिन्नर-घोटी महामार्गावरील घोरवड घाटात सुमारे 3  ते 4 किलोमीटर अंतरारावर अपघातग्रस्त अवस्थेत आढळून आल्याने या घटनेचे गूढ वाढले आहे. त्यामुळे पोलिसही चक्रावुन गेले आहेत. आकाश मोहन खताळे असे गळफास घेणाऱ्या युवकाचे नाव असून आकाश रात्री एक वाजेच्या सुमारास पांढुर्लीकडून सिन्नरच्या दिशेने कार घेऊन एकटाच निघाला होता. पहाटेच्या सुमारास सिन्नर-घोटी महामार्गावरील हॉटेल जय भवानीजवळील रसवंतीगृहाच्या जवळ शेडला गळफास घेतलेल्या अवस्थेत आकाशचा मृतदेह आढळून आला. 


आत्महत्येचं गूढ कायम.... 


दरम्यान हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फूटेज पोलिसांनी तपासले असता आकाश खताळे रात्री एकटा आल्याचे दिसत होते. तपासात आकाश खताळे हा काही वेळ महामार्गाच्या कडेलाही उभा होता. त्यानंतर रसवंतीगृहाच्या शेडकडे जाताना तो दिसून आल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांच्या प्राथमिक तपासात आकाशने आत्महत्या केली असून अपघात झाल्यानंतर पायी चालत जाऊन त्याने गळफास घेतल्याचं समोर आले. पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर शवविच्छेदन करण्यात आले. सिन्नर पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.