Nashik News : नाशिक (Nashik) शहरात तापमान वाढत असून काल 39 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. मात्र आदल्या दिवशी नाशिकचा पारा चाळिशीपार झालेला अनुभवयास मिळाला. तर जळगावमध्ये उष्माघाताने एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना देखील घडली. या पार्श्वभूमीवर नाशिक आरोग्य प्रशासन सतर्क झाले असून मनपाच्या माध्यमातून चार रुग्णालयात हिट स्ट्रोक रूम सज्ज करण्यात आली आहेत. 


गेल्या आठवडाभरापासून शहर परिसरात (Nashik Temperature) उष्णतेची लाट कायम आहे. शहरात सातत्याने तापमानाचा (Temprature) चाळीशीच्या आसपास राहत असल्याने शहरातील नागरिक घामाघूम झाले आहेत. मात्र दुपारच्या सुमारास सद्यस्थितीत नाशिककर बाहेर पडत नसल्याचे चित्र आहे. त्याचबरोबर पुढील काही दिवसांत शहराचे तापमान जैसे थे असणार असल्याने दुपारी बाहेर फिरणे नागरिक टाळत आहेत. पुढच्या काही दिवसात उष्णतेची लाट अधिक तीव्र होणार असण्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिका अलर्ट झाली असून पालिकेने चार रुग्णालयात उष्माघात कक्ष सज्ज ठेवला आहे. दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा वाहत असल्याने महापालिका सतर्क झाली आहे.


सकाळी सात वाजेपासून ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत उन्हाचा तडाखा जाणवत आहे. उन्हामुळे नागरिकांच्या तब्येतीत बिघाडहोत असल्याची उदाहरणे आहेत. यामुळे पालिकेने महत्वाचा निर्णय शहरातील चार रुग्णालयात हिट स्ट्रोक रूम सज्ज करण्यात आल्या आहेत. यानुसार नाशिकरोड येथील बिटको, जाकीर हुसेन, पंचवटी व सिडकोतील मोरवाडी येथील पालिकेच्या रुग्णालयात प्रत्येकी पाच उष्माघात कक्षात पाच खाटांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. हवामान विभागाने नुकतीच उष्णतेची लाट येणार असल्याचे भाकीत केले आहे त्यानुसार पालिकेने खबरदारी घेतली आहे. उष्णतेची लाट येण्याच्या पार्श्‍वभूमीवर पालिकेचा आरोग्य विभाग दक्ष झाला असून, प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात उष्माघात कक्ष स्थापन करण्याचे निर्देश काही दिवसापूर्वी देण्यात आले होते. 


नाशिकचा पारा चाळीशी जवळ 


दरम्यान नाशिक शहरातील तापमानाचा पारा सध्या 37 ते 40 अंशांपर्यंत जात आहे. मे च्या शेवटच्या आठवड्यात पारा  शहराचे तापमान 42 अंशांपेक्षा अधिक राहणार असल्याने या पार्श्वभूमीव पालिकेने उष्माघात कक्षाची उभारणी केली आहे. आवश्यकता वाटल्यास उष्माघात कक्ष संख्या वाढवली जाऊ शकते. शहरात रेल्वे स्थानक, सातपूर एमआयडीसी आदी सह विविध भागात हजारोच्या संख्येने कामगार काम करत असतात. मात्र उन्हाचा फटका बसून उष्माघात होण्याचे भीती आहे. यामुळे पालिकेच्या रुग्णालयात उष्माघात कक्षाची अत्यावश्यक गरज असते. 


नागरिकांनी काळजी घ्या... 


महाराष्ट्रात दरवर्षी 1 मार्च ते 31 जुलै या कालावधीत उष्णता विकार प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी विविध पातळीवर उपाय योजना आखण्यात येतात. तसेच या आजाराचे दैनंदिन सनियंत्रण आणि सर्वेक्षण करण्यात येतं. वाढत्या उन्हाच्या तापमानात अनेक शारीरिक समस्या उद्भवू लागतात. यात निर्माण होणारी आणखी एक समस्या म्हणजचे उष्माघात. उष्माघात ही हंगामी समस्या असू शकते. पण, त्यावर वेळीच उपचार न केल्यास तो जीवघेणाही ठरू शकतो.  खारघर येथे उष्माघातामुळे तेरा श्री सदस्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर सर्वत्र उन्हापासून बचावासाठी उपाययोजना करण्यात येऊ लागल्या होत्या आणि पालिका प्रशासन देखील सतर्क झाले होते. त्यामुळे सद्यस्थितीत वाढलेल्या उन्हामुळे नागरिकांना त्रास होऊ नये, नागरिकांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.