Nashik Crime : नाशिक (Nashik) शहरासह जिल्ह्यातील एसीबीचे आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई झाली. जिल्हा उपनिबंधक म्हणून कार्यरत असणाऱ्या सतीश खरे यांना तीस लाख रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली. सतीश खरे पुढील पाच महिन्यात निवृत्त होणार होता. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून अशा पद्धतीने नागरिकांकडून पैसे उकळून आगामी काळात विधानसभेची वारी करण्याचा मानस सतीश खरे यांनी ठेवल्याचे समोर आले आहे. मात्र हा त्यांचा खोटा प्लॅन पूर्णतः फसल्याचे समोर आले आहे. 


तीन दिवसांपूर्वी नाशिक सहकार विभागाचे उपनिबंधक (District Deputy Registrar) सतीश खरे (Satish Khare) यांना 30 लाखांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात आली. त्यांनतर लागलीच सर्वच स्तरावरुन भ्रष्ट अधिकार्यांविरुद्ध टीकेची झोड उठली आहे. सतीश खरे यांना अटक करण्यात आल्यानन्तर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. शिवाय तीन दिवसांच्या पोलीस कोठडींनंतर आज पुन्हा एसीबी (ACB) अधिकच्या कोठडीची मागणी करणार असल्याचे समजते. मात्र मागील तीन दिवसांच्या तपासानंतर खरे यांच्या घरातून मोठे घबाड मिळाल्याची शकयता आहे. खरेंच्या इतर बँक खात्यांसह लॉकर्सची झाडाझडती घेण्यात येत असून आणखी घबाड हाती लागण्याची शक्यता आहे.


नाशिक विभाग सध्या पहिल्या क्रमांकावर असून गेल्या 117 दिवसात तब्बल 66 लाचखोर एसीबीच्या जाळ्यात अडकले आहेत. दोनच दिवसांपूर्वी 30 लाखांची लाच स्वीकारताना सहकार विभागाचे उपनिबंधक सतीश खरे यांना  रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. सतीश खरे हा 19 मेपर्यंत एसीबीच्या कोठडीत असून त्यांनी मोठं घबाड गोळा केल्याचा संशय आहे. आज पुन्हा त्यास न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. तत्पूर्वी पोलीस तपास सुरू असून या तपासातून खरेसह त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावे विविध बँकेत 13 खाती आहेत. त्यापैकी काल 8 खाती उघडण्यात आली असता त्यात 43 लाख 76 हजार रुपये आढळून आले आहेत. आज त्यांच्या इतर बँक खात्यांसह लॉकर्सची झाडाझडती घेण्यात येणार असून आणखी घबाड हाती लागण्याची शक्यता आहे.


आमदारकी लढवण्यासाठी माया जमवली?


लाचखोर उपनिबंधक सतीश खरेच्या अडचणी वाढण्याची शक्यता असून सतीश खरेची आज पोलीस कोठडी संपणार आहे. त्यामुळे पोलीस कोठडी वाढवून देण्याची एसीबी मागणी करणार आहे. दरम्यान पोलीस तपासात सतीश खरेने कोट्यवधींचं घबाड गोळा केल्याची चर्चा असून सहकार विभागाकडून वादग्रस्त प्रकरणाच्या फाईल्स तपासणार आहेत. 30 लाखांची लाच घेतल्याप्रकरणी सतीश खरे यास रंगेहाथ अटक करण्यात आली होती. महत्वाचे म्हणजे सतीश खरे हा काही महिन्यांनी सेवानिवृत्त होणार होता, त्यानंतर त्याला नाशिकच्याच एका मतदारसंघातून आमदारकीची निवडणूक लढवायची होती आणि त्यासाठीच तो ही माया गोळा करत होता, अशी दबक्या आवाजात नाशिकमध्ये चर्चा आहे. 


पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांकडे तक्रार


दरम्यान तब्बल 30 लाखांची लाच घेत नाशिक जिल्हा उप निबंधक सतीश खरे यांचे 'खोटे' कारनामे आता उजेडात येऊ लागले आहे.  ज्या ठिकाणी खरे यांनी नोकरी केली, त्या ठिकाणी सहकारी संस्था अडचणीत आणत भ्रष्टाचार करुन कोट्यवधीची माया जमवली असल्याचा आरोप करत येवला मर्चंट्स बँकेचे संचालक व भाजपचे ज्येष्ठ नेते धनंजय कुलकर्णी यांनी थेट पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांकडे तक्रार केली आहे. जिल्ह्यातील काही आमदार व राजकीय नेते यांच्या संगनमताने जमिनी आणि प्लॉट खरेदी केल्याचाही त्यांनी संशय व्यक्त करतांना या सर्व प्रकाराची ईडी, सीबीआय या संस्थेमार्फत सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. तशा आशयाची तक्रार ई मेलद्वारे देशाचे पंतप्रधान आणि सहकार मंत्री तथा गृहमंत्री यांच्याकडे केली आहे.