Nashik News : आई आपल्या बाळासाठी काय करेल हे सांगता येत नाही. काही क्षणांसाठी बाळ इकडं तिकडं झालं, तरी आईचा (Aai) जीव कासावीस होतो. मग अशावेळी कितीही मोठं संकट येऊ दे मात्र आई धैर्याने तोंड देऊन बाळाचं रक्षण करते. याची अनेक उदाहरण आहेत, त्यापैकीच एक म्हणजे लहानपणी इतिहासात वाचलेली, ऐकलेली हिरकणीची गोष्ट. आपल्या तान्हुल्याला कवेत घेणेसाठी अवघड असा कडा उतरुन हिरकणी घरी पोहचते. हीच हिरकणी पुन्हा एकदा आपल्या बाळासाठी कडा नाही पण उत्तुंग अशा इमारतीवरून जीव धोक्यात घालून उतरल्याचे गोष्ट नाशिक (Nashik) शहरात घडली आहे.
नाशिक (Nashik) शहरातील पेठरोड (PethRaod) परिसरातील ही घटना असून तृप्ती जगदाळे सोनार (Trupti Sonar) असे हिंमतवान आईचे नाव आहे. आपल्या दीड महिन्याच्या बाळाला घरात ठेवून कचरा टाकण्यासाठी ही 28 वर्षीय विवाहिता गॅलरीत आली. मात्र याचवेळी अचानक गॅलरीचा दरवाजा हवेमुळे बंद झाला. त्यातच घराचा मुख्य दरवाजाही आतून बंद होता. बाळ घरात एकटाच असल्याने ती कासावीस झाली. मात्र, क्षणाचाही विलंब न करता ती लोखंडी ग्रीलच्या साह्याने तिसऱ्या मजल्यावरील पायऱ्यांवर उतरली. तेथून पाइपच्या साहाय्याने चौथ्या मजल्यावर जाऊन, मागच्या दरवाजातून घरात प्रवेश केला आणि बाळाला बघताच तिला अश्रू अनावर झाले.
धुळे (Dhule) जिल्ह्यातील शिरपूर (Shirpur) येथील रहिवासी असलेले जगदाळे सोनार कुटुंबीय सध्या नाशिकच्या पेठरोड भागातील एका सोसायटीतील चौथ्या मजल्यावर वास्तव्यास आहे. पती स्वप्नील हे तीन वर्षीय मुलगी मृण्मयी हिच्यासह नातेवाइकांकडील साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी 21 मे रोजी शिरपूरला आले होते. मात्र, उन्हाचा त्रास होईल म्हणून पत्नी तृप्ती आणि दीड महिन्यांचे बाळ मल्हार हे नाशिकलाच थांबले होते. त्या दिवशी दुपारी दीड महिन्याच्या बाळाला झोपवून झोळीत टाकल्यानंतर तृप्ती जगदाळे यांनी घराचा केरकचरा काढला त्यानंतर तो कचरा मुख्य दरवाजाच्या बाहेर असलेल्या केरकचरा डब्यात टाकण्यासाठी गेल्या असतांना हवेने दरवाजा लॉक झाल्यामुळे तृप्तीची तारांबळ उडाली. एक कासावीस झालेला जीव, दुसरीकडे घरात अडकून पडलेलं दिड महिन्यांच बाळ, बापरे, आता त्याचं काय होईल? या भीतीनं तिची गाळण उडाली.
काय घडलं नेमकं?
हवेने गॅलरीचा दरवाजा बंद झाला अन्....तिची तारांबळ उडाली. अशातच चौथ्या मजल्यावरचा फ्लॅट. दुपारची सामसुम, क्षणाचा विलंब न करता तिच्यातल्या आईने चौथ्या मजल्यावरच्या चार फुट उंच गॅलरीतुन उडी मारुन मागच्या बाजुला असलेल्या फुटभर रुंदी असलेल्या ग्रीलच्या बाजुने तेथल्या पाईपच्या सहाय्याने आपल्या फ्लॅटच्या खिडकीपाशी आली आणि पुन्हा उडी मारत आपल्या घरात शिरली. आधी बाळाला पोटाशी लावले अन् मग आतुन दरवाजा उघडला आणि सुटकेचा श्वास सोडला. मातृत्वाचा तो विजय होता, का ग बाई, चौथ्या मजल्याच्या बॅक गॅलरीतून तुला पडायची भिती नाही का वाटली? तेव्हा ती म्हणाली, मला त्यावेळी काहीच दिसत नव्हतं, मी खालीही पाहत नव्हती. मला दिसत होतं ते फक्त माझं बाळ
हिंमतवान हिरकणीचे कौतुक
कुटुंबीय शिरपूरला गेल्याने दोघेच मायलेक घरी होते. त्यामुळे मुख्य दरवाजा आतून बंद करून घरकामात व्यस्त होत्या. अशातच कचरा टाकण्यासाठी म्हणून त्या गॅलरीत गेल्या. यावेळी दीड महिन्याचा मल्हार घरात झोपलेला होता. अचानक हवेमुळे गॅलरीचा दरवाजा बंद झाल्याने, त्या बाहेरच राहिल्या. आता काय करायचं? असा पेचप्रसंग त्यांच्यापुढे उभा राहिला. मात्र, मागील दरवाजा उघडा असल्याचे त्यांच्या लक्षात आले. तिथे पोहोचण्यासाठी त्यांनी ग्रीलच्या साहाय्याने गॅलरीतून तिसऱ्या मजल्यावर उतरल्या. त्यानंतर मागच्या बाजूला जाऊन पाईपाच्या साह्याने, परत चौथ्या मजल्यावर गेल्या आणि तेथून घरात प्रवेश केला. घरात शिरताच त्यांनी आधी बाळाला पोटाशी धरले अन मग बंद झालेला दरवाजा उघडला. संध्याकाळी सर्वजण घरी आल्यावर सर्वांना ही गोष्ट कळली. सध्या तिच्या हिमतीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.