Maharashtra Budget Session : राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे (Saroj Ahire) आपल्या बाळाला घेऊन विधीमंडळात दाखल झाल्या मात्र बाळाला ठेवण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या हिरकणी कक्षामध्ये सोयी सुविधा नसल्याने त्यांना काही वेळातच विधीमंडळातून काढता पाय घ्यावा लागला. हिरकणी कक्षाची दूरवस्था पाहून सरोज अहिर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 


हिरकणी कक्षाची अवस्था पाहून आमदार सरोज अहिर यांच्या डोळ्यात पाणी आले. नागपूर अधिवेशनात आमदार सरोज अहिरे आपल्या लहान बाळाला घेऊन आल्यानंतर नागपुरात त्यांच्यासाठी हिरकणी कक्षाची व्यवस्था करण्यात आली होती. या अधिवेशनालाही सरोज अहिरे आपल्या लहान बाळाला घेऊन आलेल्या आहेत. परंतु हिरकणी कक्ष खराब असल्याने विधीमंडळातून काढता पाय घेतला आहे. विधानभवनातील हिरकणी कक्षाची अवस्था पाहून आमदार सरोज आहिरे यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.  माझ्या मतदारसंघातील लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी या अधिवेशनात माझ्या लहान मुलाला घेऊन आलेले आहे. लहान मुलाची तब्येत ठीक नसतानाही मी घेऊन आले आहे. माझ्या मागण्यांची योग्य दखल घेतली नाही तर मी पुन्हा माझ्या मतदारसंघात जावे लागेल, असे सरोज अहिरे म्हणाल्या. 


...तर मला पुन्हा मतदारसंघात जावे लागेल


 आमदार सरोज आहिरे म्हणाल्या, लोकप्रतिनिधींसोबत लहान मुले असतील त्यांच्यासाठी हिरकणी कक्ष सुरु करण्यात आलेला आहे. सचिवांना या संदर्भातले पत्र देखील दिले होते. मात्र हे सर्व करुनही हिरकणी कक्षामध्ये प्रचंड धूळ आहे. कक्षातील सोफे देखील फाटलेले आहेत. त्या ठिकाणी मी माझ्या बाळाला कसं ठेवणार? शौचालयाची देखील व्यवस्था करण्यात आलेली नाही. जर यात आज बदल केले नाहीत तर मला पुन्हा मतदारसंघात जावे लागेल.


चिमुकल्या बाळाला घेऊन अधिवेशनासाठी


विधीमंडळाचे अधिवेशन आजपासून सुरु झाले. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी नाशिकच्या आमदार सरोज अहिरे-वाघ या अडीच महिन्यांच्या चिमुकल्या बाळाला घेऊन विधान भवनात पोहोचल्या. मी आई आहेच सोबत आमदारही आहे, त्यामुळे दोन्ही कर्तव्ये महत्वाची आहेत. बाळ माझ्याशिवाय राहू शकत नाही, सोबत मतदारसंघातील लोकांचे प्रश्नही महत्वाचे आहेत, त्यामुळे बाळाला घेऊन यावे लागले अशी भावना अहिरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केली. अडीच महिन्याचा प्रशंसक आई सरोज अहिरेंशिवाय राहत नाही. म्हणून त्या आपल्या बाळाला घेऊनच आज अधिवेशनासाठी पोहोचल्या. विधानभवनात लहान बाळांसाठी करण्यात आलेल्या विशेष कक्षाची अवस्था पाहून त्यांनी काढता पाय घेतला. 


कोण आहेत आमदार सरोज अहिरे?


नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनाला आमदार सरोज अहिरे या चर्चेच्या विषय ठरल्या होत्या. अडीच महिन्याच्या बाळाला घेऊन आल्यानतर त्यांची चर्चा झाली होती. सरोज अहिरे या नाशिकमधल्या देवळाली मतदारसंघाच्या आमदार असून 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्या विजयी झाल्या. राष्ट्रवादीच्या युवा आमदारांमध्ये सरोज अहिरे यांचं नाव घेतलं जातं, मतदारसंघात जनेतशी नाळ असलेल्या आमदार म्हणून त्या ओळखल्या जातात. आमदार सरोज अहिरे यांचे पती नाशिकमधली प्रसिद्ध दंतरोग तज्ज्ञ आहेत. फेब्रुवारी 2021 मध्ये सरोज अहिरे आणि प्रवीण वाघ यांचं लग्न झालं.